रिक्षाचालक मोटार चालवायला गेला अन् नियंत्रण सुटून महिलेचा जीव गेला; कोल्हापुरातील गंगावेशमध्ये भाजीमंडईत भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 11:33 IST2025-10-15T11:31:58+5:302025-10-15T11:33:22+5:30
दोघे जखमी, चालक ताब्यात

रिक्षाचालक मोटार चालवायला गेला अन् नियंत्रण सुटून महिलेचा जीव गेला; कोल्हापुरातील गंगावेशमध्ये भाजीमंडईत भीषण अपघात
कोल्हापूर : गंगावेशीतील एक उत्साही रिक्षाचालक मित्राची वडापची मोटार (इको) नंबरला लावण्यासाठी घेऊन जाताना नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दही विकणारी एक महिला जागीच ठार झाली, तर दोघे जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि. १४) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास गंगावेशीतील शाहू उद्यानासमोर झाला. थरकाप उडवणाऱ्या अपघाताने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला.
सुशीला कृष्णात पाटील (वय ५५, रा. आसुर्ले, ता. पन्हाळा) असे मृत महिलेचे नाव आहे. शंकर मच्छिंद्रनाथ गोसावी (६९, रा. दांडगेवाडी, ता. करवीर) आणि बेबीताई हिंदुराव पाटील (७६, रा. देवाळे, ता. करवीर) या जखमी झाल्या. अपघातानंतर पळून गेलेला मोटार चालक उमेश बाळासो मस्कर (५१, रा. शिंगणापूर, ता. करवीर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गर्दीच्या ठिकाणी बेपर्वाईने वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला. तसेच, कार जप्त केली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गंगावेश परिसरात शिंगणापूर, हणमंतवाडी, वाकरे, खुपिरे येथे जाणाऱ्या रिक्षा आणि मोटारचे वडाप थांबते. याच परिसरात शाहू उद्यानाबाहेर मंडई भरते. यात दही, लोणी, तूप, देशी अंडी विकणाऱ्या विक्रेत्यांचाही समावेश असतो. आसुर्ले येथील सुशीला पाटील या गेल्या २० वर्षांपासून दही आणि लोणी विकण्यासाठी गंगावेशीतील बाजारात येत होत्या. मंगळवारी सकाळी त्या भावजय सुनीता बाबासो मेथे (३७, रा. केर्ले, ता. करवीर) आणि इतर महिलांसोबत आल्या होत्या.
सकाळी सव्वाअकराच्या सुमारास विक्रेत्या महिला सोबत आणलेले डबे उघडून जेवणाच्या तयारीत होत्या. त्याचवेळी चौकातून आलेली भरधाव मोटार महिलांच्या अंगावरून गेली. या अपघातात मोटारीची जोरदार धडक लागून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे सुशीला पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर बेबीताई पाटील आणि शंकर गोसावी हे जखमी झाले. सीपीआरमध्ये दाखल करताच सुशीला यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. अपघाताची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली.
अपघातस्थळी विदारक दृष्य
मोटारीने केळी विक्रेत्याच्या हातगाडीला धडक देऊन महिलांना फरफटत नेले. या अपघातामुळे विक्रेत्यांच्या केळी, अंडी, दही, लोणी परिसरात विखरून पडले होते. नागरिकांनी तातडीने धाव घेऊन जखमींना मोटारीखालून बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. थरकाप उडवणाऱ्या अपघातामुळे काही भाजी विक्रेत्या महिलांना भोवळ आली. अपघाताची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वाहतूक पोलिसांनी बघ्यांची गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली.
जेवायला सुरुवात करणार तोच काळाचा घाला
सकाळी सातला मंडईत आलेल्या महिला अकरा ते साडेअकराच्या सुमारास जेवतात. नेहमीप्रमाणे महिलांनी जेवणाचे डबे काढून एकमेकांना भाजी, लोणचे देणे सुरू होते. जेवायला सुरुवात करणार एवढ्यात काळाने घाला घातला. यात सुशीला पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मोटार आपल्याच दिशेने येत असल्याचे लक्षात येताच काही महिला बाजूला झाल्याने सुदैवाने त्या बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पाडळकर मार्केट ओस
गंगावेश परिसरात रस्त्यावरच मंडई भरते. पाडळकर मार्केटमध्ये विक्रेत्यांना जागा दिली आहे. मात्र, ते मार्केट ओस पडलेले असते. ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला गंगावेशीतच रस्त्याकडेला बसून भाजीपाला आणि दही विकतात. अतिक्रमण वाढल्यामुळे या परिसरात अपघातांचा धोका वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली.