Kolhapur: लग्न ठरले होते.. दिवाळीनंतर बार उडवायचा होता; पण, तत्पूर्वीच पुण्यात बावड्याच्या पोलिसाने जीवन संपविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:51 IST2025-07-09T17:50:09+5:302025-07-09T17:51:54+5:30
कारण अद्याप अस्पष्ट

Kolhapur: लग्न ठरले होते.. दिवाळीनंतर बार उडवायचा होता; पण, तत्पूर्वीच पुण्यात बावड्याच्या पोलिसाने जीवन संपविले
कसबा बावडा : लग्न ठरले होते.. दिवाळीनंतर बार उडवायचा होता; पण लग्नाचा बार उडायच्या आतच त्याने पुण्यात गळफास घेऊन या जगाचा कायमचा निरोप घेतला. स्वरूप विष्णू जाधव (वय २८, रा. भगवा चौक, मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी ७ वाजता त्यांच्यावर बावडा स्मशानभूमीत पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार केले. व्यायाम आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेल्या स्वरूप २०२३ साली पुणे पोलिस दलात भरती झाले. मुख्यालयाच्या शेजारीच असलेल्या स्वारगेट पोलिस लाइनमध्ये ते राहत होते. रूममधील खिडकीच्या अँगलला टॉवेलच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी त्यांचा मृतदेह बावडा येथील मराठा कॉलनी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. दरम्यान, स्वरूप यांच्या निधनाचे वृत्त समजतात त्यांच्या मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता त्यांच्यावर कसबा बावडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.
स्वरूप मित्रांना म्हणायचे माझे आता लग्न ठरलेय. रजा शिल्लक पाहिजेत. दिवाळीनंतर मी लग्न करणार आहे. तुम्ही पण मुली बघा आणि लग्न करा, असे ते नेहमी मित्रांना म्हणायचे. असे त्यांच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत पुढील तपास पुणे खडकवासला पोलिस करीत आहेत. स्वरूप यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी सकाळी आहे.
महिनाभरात पाच ते सात जणांच्या आत्महत्या !
बावड्यात गेल्या महिना-दीड महिन्यात विविध कारणांनी पाच ते सात जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील अनेकांची आत्महत्येची कारणे समजलेली नाहीत. सतत तरुणांच्या आत्महत्या होत असल्याने बावडा हादरला आहे.