महापुरुषांच्या फोटो शेजारी टिपू सुलतानचा फोटो, कोल्हापुरातील मौजे वडगाव येथील शाळेत तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:16 IST2024-01-25T14:16:18+5:302024-01-25T14:16:41+5:30
पोलीस छावणीचे स्वरूप

महापुरुषांच्या फोटो शेजारी टिपू सुलतानचा फोटो, कोल्हापुरातील मौजे वडगाव येथील शाळेत तणाव
हेरले : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील शाळेत वर्ग सजावटीत महापुरुषांच्या फोटो शेजारी टिपू सुलतानचा फोटो लावल्याने गावात तणाव निर्माण झाला. हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनास धारेवर धरत फोटो लावणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करून त्याला शाळेतून काढून टाकण्याची मागणी केली.
याबाबत घटस्थळावरून मिळालेली माहिती अशी, मौजे वडगाव येथील बालावधूत हायस्कूलमध्ये शाळेंतर्गत वर्ग सजावट सुरू आहे. शाळेतील शिक्षकांच्या आदेशावरून वर्ग सजावटीसाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा केली होती. या वर्गणीतून महापुरुषांचे फोटो व अन्य सजावटीचे साहित्य खरेदी केले होते. सजावट करताना महापुरुषांच्या फोटोशेजारी एका विद्यार्थ्याने टिपू सुलतानचा फोटो लावला होता. हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिक्षकांना सांगितल्यावर टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आला.
काल, बुधवारी (दि.२४) सकाळी गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेऊन विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाका, असा आग्रह धरला. मागणीसाठी शाळेतच ठिय्या मारला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.
दरम्यान, करवीर पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, शिरोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी आणि गटशिक्षण अधिकारी शाळेत दाखल झाले झाले. यामध्ये मध्यस्थी करत जमावाला नियंत्रणात आणले. दरम्यान, गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले. लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ व शाळा व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनुसार संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करत त्याचा दाखला देण्याचे ठरले. त्यानंतर या वादावर तोडगा पडला.