Kolhapur: भूसंपादन अहवाल गेला; पण अंबाबाईचा विकास रखडला, संपादनासाठी दिलेले तीन पर्याय कोणते.. जाणून घ्या
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 9, 2025 18:19 IST2025-10-09T17:49:53+5:302025-10-09T18:19:32+5:30
पहिल्या टप्प्यात १४३ काेटींच्या कामांना तांत्रिक मंजुरी

Kolhapur: भूसंपादन अहवाल गेला; पण अंबाबाईचा विकास रखडला, संपादनासाठी दिलेले तीन पर्याय कोणते.. जाणून घ्या
इंदुमती गणेश
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत केल्या जाणाऱ्या भूसंपादनाच्या नुकसानभरपाईचा अहवाल शासनाकडे जाऊन महिना झाला तरी बैठक न झाल्याने याचा निर्णय रखडला आहे. नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याने सगळ्यांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.
दरम्यान, मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या पहिल्या टप्प्यातील अंतर्गत जतन संवर्धनाच्या विकास कामाच्या अंदाजपत्रकाला पुरातत्त्व विभागाची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आता त्यावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
मंदिराच्या १४५० कोटींच्या विकास आराखड्याला मे महिन्यात मंजुरी मिळाली. भूसंपादन कसे करता येईल यावर निर्णय घेण्यासाठी नगर विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली याच विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त यांची समिती गठित केली आहे.
त्यामध्ये नगररचना व मूल्य निर्धारण संचालक हे सदस्य सचिव आहेत. भूसंपादनाचे तीन पर्याय मांडून जिल्हा प्रशासनाने आपला अहवाल सदस्य सचिवांकडे पाठवला. त्याला महिना झाला तरी अजून समितीची बैठक न झाल्याने भूसंपादन कसे करायचे, याचा निर्णय झालेला नाही.
रक्कम, पुनर्वसन..
मंदिर बाह्य परिसरातील सध्याची स्थिती बघता रहिवाशांना रोख रक्कम स्वरूपातच नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. कॉरिडॉरअंतर्गत सध्या मंदिर परिसराशी निगडित १५० दुकानांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव आहे. दुकानांची संख्या वाढू शकते. सध्या तर या दोनच पर्यायांवर विचार करावा लागेल. ‘टीडीआर’चा पर्याय कितपत लागू करता येईल याबद्दल साशंकता आहे.
लवकरच निविदा प्रक्रिया
मंदिराअंतर्गत जतन, संवर्धनासाठीच्या पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या कामाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असून पुरातत्त्व विभागाकडून लवकरच त्याची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पहिला टप्पा
५०० कोटींचा त्यापैकी फक्त मंदिर जतन, संवर्धनाच्या कामासाठी १४३ कोटी. मंदिराला लागून असलेल्या इमारतींचे संपादन त्यासाठी २५७.९४ कोटी. बांधकामासाठीचा खर्च १६३.३९ कोटी. लोअर लेव्हल प्लाझा एक यामध्ये स्वच्छतागृह, लॉकर रूम, चप्पल स्टँड व पिण्याचे पाण्याची सोय, दुकाने २८, आच्छादित दर्शन मंडप यात १ हजार भक्तांची बैठक व्यवस्था. ४ हजार भक्तांसाठी दर्शनरांग प्रत्येकी १ हजार क्षमतेचा चार हॉल, ॲम्फीथिएटर स्टेज व त्यासमोरील प्लाझा व लँडस्केपिंग, माहिती केंद्र, सुरक्षा विभाग. अपर लेवल प्लाझा एक यामध्ये पार्किंग ५० चारचाकी व केएमटी बसथांबा, लोअर प्लाझा व पार्किंगसाठी विविध ठिकाणी प्रवेश मार्ग, ड्रॉप ऑफ पॉइंट, मंदिरासाठी भूमिगत प्रवेश मार्ग.
दुसरा टप्पा
मंदिर बाह्य दुकाने-रहिवासी मिळकतींचे संपादन व पुनर्वसन. कॉरिडॉरअंतर्गत स्थानिक बाजारपेठेचा विकास, अन्नछत्र, वेद पाठशाळा, अतिक्रमणांचे नियोजन.
संपादनासाठी मांडले हे तीन पर्याय
- रोख रक्कम स्वरूपात नुकसानभरपाई
- परिसरातच पुनर्वसन
- टीडीआर देऊन भरपाई