Kolhapur: एसटी बसमध्ये मुलाकडून वारंवार त्रास, कंटाळून अल्पवयीन मुलीने जीवन संपविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:32 IST2025-08-16T12:32:23+5:302025-08-16T12:32:47+5:30
संतप्त ग्रामस्थांचा कँडल मार्च

Kolhapur: एसटी बसमध्ये मुलाकडून वारंवार त्रास, कंटाळून अल्पवयीन मुलीने जीवन संपविले
पेठवडगाव : किणी (ता. हातकणंगले) येथे सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन कोल्हापूर येथील बालसुधारगृहात पाठविले आहे. बुधवारी रात्री पेठवडगाव पाेलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, किणी येथील अल्पवयीन मुलगी पेठवडगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्याच गावातील अल्पवयीन मुलगा तिला मागील काही दिवसांपासून वारंवार त्रास देत होता. बुधवारी (दि.१३) महाविद्यालयातून परत येताना एसटी बसमधूनही त्याने मुलीच्या शेजारी बसून पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला.
दुपारी घरी परतल्यावर मुलीने आईला संपूर्ण प्रकार सांगितला. आईने कामावरून आल्यावर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. परंतु, सायंकाळी पाचच्या सुमारास आई घरी पोहोचताच मुलगीने घरातील तुळईला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तत्काळ ही घटना पोलिसांना कळविण्यात आली. नवे पारगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
ही धक्कादायक घटना समजताच ग्रामस्थांतून संतापाची लाट उसळली. बुधवारी रात्री उशिरा अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी त्याला कोल्हापूर येथील बालन्याय मंडळात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
दरम्यान, घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोषीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. गुरुवारी रात्री ग्रामस्थांनी कँडल मार्च काढत पीडितेला श्रद्धांजली वाहिली. तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. तपास पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील करीत आहेत.