घराजवळ दुचाकी फोडल्या, ठाण्यात पोलिसांच्या गाड्याही नाही सोडल्या; कोल्हापुरात मनोरुग्णाने पोलिसांना फोडला घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:02 IST2025-09-16T16:02:15+5:302025-09-16T16:02:15+5:30

करवीर पोलिस ठाण्यातील प्रकार

A mentally ill man in Kolhapur thrashed the police by vandalizing a car | घराजवळ दुचाकी फोडल्या, ठाण्यात पोलिसांच्या गाड्याही नाही सोडल्या; कोल्हापुरात मनोरुग्णाने पोलिसांना फोडला घाम

संग्रहित छाया

कोल्हापूर : नवीन वाशी नाका येथे राहणाऱ्या एका तरुणाने घराजवळ पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड केली. रहिवाशांनी कळवताच करवीर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसांचीच दोन वाहने फोडून त्याने गोंधळ घातला. आधीच फुलेवाडी रिंगरोड येथील खुनाच्या घटनेने तणावात असलेल्या करवीर पोलिसांना तोडफोडीच्या घटनेने घाम फुटला. हा प्रकार शनिवारी (दि. १३) मध्यरात्री घडला.

नवीन वाशी नाका परिसरातून पोलिसांच्या ११२ आपत्कालीन क्रमांकावर एक तक्रार आली होती. एक तरुण दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवत असल्याने तातडीने पोलिसांना पाठवा, असे तक्रारदाराने सांगितले. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत ११२ कॉलचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोडफोड करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याला घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचले. काही वेळ त्याला बसवून ठेवले होते.

दरम्यान, पोलिसांची नजर चुकवून तो बाहेर आला आणि पोलिस ठाण्याच्या आवारात लावलेल्या पोलिसांच्या दोन वाहनांच्या काचा फोडल्या. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी त्याला पकडून एका खोलीत डांबले. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल करून नातेवाइकांना बोलावून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलिसांची धावपळ उडाली. तातडीने दोन्ही वाहनांच्या काचा बदलून घेण्यात आल्या.

पोलिस वैतागले

फुलेवाडी रिंगरोड येथे झालेल्या खुनानंतर हल्लेखोरांच्या शोधात पोलिस गुंतले होते. गंभीर घटनेने पोलिस तणावात असतानाच थेट पोलिस ठाण्यात शासकीय वाहनांची तोडफोड झाल्याने पोलिसांना घाम फुटला. वाहनांची तोडफोड करणारा तरुण मनोरुग्ण असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले.

Web Title: A mentally ill man in Kolhapur thrashed the police by vandalizing a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.