शेतात निघालेल्या मुलीवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा भरदिवसा हल्ला; मुलीचा जागीच मृत्यू

By संदीप आडनाईक | Published: December 21, 2022 10:12 PM2022-12-21T22:12:23+5:302022-12-21T22:12:45+5:30

शाहूवाडी तालुक्यातील पुसार्ले येथे कुटुंबासह राहणाऱ्या बाबाजी डोईफोडे यांची मुलगी बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जनावरे घेऊन उदगिरीपैकी केदारलिंगवाडी येथे शेतात जात होती.

A girl in the field was attacked by a leopard in broad daylight; The girl died on the spot | शेतात निघालेल्या मुलीवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा भरदिवसा हल्ला; मुलीचा जागीच मृत्यू

शेतात निघालेल्या मुलीवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा भरदिवसा हल्ला; मुलीचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीपैकी केदारलिंगवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात बुधवारी दहावर्षीय मुलीचा मृत्यू झाला.  या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिस ठाणे आणि मलकापूर वनविभागाकडे झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झालेली कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. 

घटनास्थळावरून आणि वन विभागाने दिलेल्या  माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यातील पुसार्ले येथे कुटुंबासह राहणाऱ्या बाबाजी डोईफोडे यांची मुलगी बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जनावरे घेऊन उदगिरीपैकी केदारलिंगवाडी येथे शेतात जात होती. उदगिरी देवस्थानच्या जमिनीजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मुलगी मनीषा हिच्यावर झडप टाकली आणि तिला गवतातून जंगलात फरपटत घेऊन गेला. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारणीने घटनास्थळी धाव घेतली. तिने शोधाशोध सुरू केली असता बिबट्याने तिला गवतातून फरफटत नेल्याच्या खुणा दिसल्या. त्यामधून ती पुढे गेली असता त्या मुलीचा गळा बिबट्याने पकडल्याचे दिसले. तिने आरडा ओरडा करून लोकांना जमा केले. मात्र  तोपर्यंत या मुलीचा मृत्यू झाला होता. 

मुलीचे आई-वडील दूध घालण्यासाठी जवळच्या गावात गेले होते. त्यांना या प्रकाराची माहिती मिळतात ते तडक घटनास्थळी आले मुलीचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी आक्रोश केला तोपर्यंत आजूबाजूच्या परिसरातील लोक तिथे जमा झाले. घटनेची माहिती पोलिस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी वनविभागाला कळवली.  मलकापूर वन विभागाला या घटनेची माहिती साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मिळाली. मलकापूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अतुल भोसले यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. 

ग्रामस्थांचा घेराव 

घटनास्थळी ग्रामस्थांनी वन अधिकार्याना घेराव घालून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. माजी सरपंच विठ्ठल पाटील आणि शित्तूर वारुणच्या सरपंच विद्या सुतार यावेळी उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  वनविभागाने याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाच्या विरोधात ग्रामस्थ कमालीचा रोष व्यक्त करत आहेत. बिबट्या व अन्य प्राण्यांच्या उपद्रवाने लोक हैराण झाले आहेत. या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अधिकाऱ्यांनी सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले. त्यांची समजूत घालून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच वाजेपर्यंत पंचनामा पूर्ण केला.  मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तिथे पुढील प्रक्रिया सुरू आहे शवविच्छेदनानंतर मुलीचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात येईल.

परिसरात बिबट्याचे अस्तित्व

ही कुटुंबे मूळची शाहूवाडी तालुक्यातील पुसार्ले गावातील धनगर समाजातील असून त्यांनी केदारलिंगवाडी येथे तात्पुरते स्थलांतर करून उदगीरी देवस्थानच्या जमिनीवर तात्पुरत्या स्वरुपात चार पालं बांधली आहेत. जरी ही  देवस्थानच्या मालकीची खाजगी जमीन असली तरी ती चारही बाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेली आहे आणि या परिसरात बिबट्याचे अस्तित्व आहे. 

बिबट्याचे हल्ले

यावर्षी २० ऑक्टोबर रोजी शाहूवाडी तालुक्यातील उखळू गावात बिबट्याच्या हल्ल्यात एक ९ वर्षाचा बालक जखमी झाला होता आणि कदमवाडी येथे एकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. याशिवाय २० पेक्षा जास्त गायी-म्हशी, ५० शेळ्या, तितकीच कुत्री बिबट्याने ठार केली आहेत. केदारलिंगवाडीच्या सध्याच्या जागेपासून  हे  गाव सुमारे २५ किमी अंतरावर आहे. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड  तालुक्यातील येणके गावात बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता.

वीस लाखांची मदत मिळणार

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम ऑगस्ट महिन्यात १५ लाख रुपयांवरून २० लाख करण्यात आली आहे.याबाबत  उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी सांगितले, "उदगिरी जंगलाजवळचे हे ठिकाण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे आणि अतिदुर्गम आहे. ही घटना एका देवस्थानच्या मालकीच्या खाजगी जागेत घडली आहे. त्यामुळे या कुटुंबाला भरपाई मिळणार आहे. पंचनामा अहवाल आल्यानंतर आणि इतर कागदपत्रांची कामे पूर्ण झाल्यावर लवकरच २० लाख रुपये देण्यात येतील. यातील दहा लाख रुपयांचा धनादेश तत्काळ मदत म्हणून सुपूर्द केले जातील तर उर्वरित रक्कमेपैकी प्रत्येकी ५ लाखांची एक मुदत ठेव पाच वर्षासाठी तर दुसरी ५लाखांची मदत ठेव त्यापुढील दहा वर्षासाठी ठेवली जाईल.

Web Title: A girl in the field was attacked by a leopard in broad daylight; The girl died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.