कोल्हापूर जिल्ह्यासाठी सव्वाआठ कोटींचा येणार निधी, उभारणार ३३ ग्रामपंचायती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:39 IST2025-07-25T12:38:54+5:302025-07-25T12:39:30+5:30
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ५०० ग्रामपंचायतींसाठी ३२४ कोटी २८ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली

कोल्हापूर जिल्ह्यासाठी सव्वाआठ कोटींचा येणार निधी, उभारणार ३३ ग्रामपंचायती
कोल्हापूर : जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींची कार्यालये उभी करण्यासाठी तब्बल सव्वाआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत ही तरतूद करण्यात आली असून आता कार्यालयांशेजारी नागरी सुविधा केंद्राच्या खोलीसाठी एक स्वतंत्र खोलीही बांधण्यात येणार आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ५०० ग्रामपंचायतींसाठी ३२४ कोटी २८ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र पुरस्कृत असलेल्या या योजनेतील ६० टक्के निधी केंद्र शासनाचा असून ४० टक्के निधी राज्य शासनाचा आहे. केंद्र शासनाने निकष बदलताना आता ग्रामपंचायतीच्या कार्यालयाशेजारी नागरी सुविधा केंद्रासाठी स्वतंत्र खोली बांधण्याचेही नियोजन केले आहे.
येथून विविध प्रकारच्या ऑनलाइन दाखल्यापांसून अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. म्हणूनच मूळ ग्रामपंचायतीसाठी २० लाख रुपये आणि या नागरी सुविधा केंद्राच्या खोलीसाठी ५ लाख रुपये असा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
निधी मंजूर झालेल्या ग्रामपंचायती
- करवीर : केर्ले, सरनोबतवाडी, हणमंतवाडी, आमशी, बोलोली, वरणगे, चिंचवाड, दिंडनेर्ली
- गडहिंग्लज : हिटणी, हसूरचंपू, हलकर्णी
- हातकणंगले : घुणकी, वडगाव, पाडळी
- कागल : चिखली
- राधानगरी : तुरंबे, आवळी बुद्रुक, म्हासुर्ली,
- शाहूवाडी : कडवे
- शिरोळ : कोथळी, उमळवाड, शेडशाळ, कवठेसार, जांभळी, टाकळी, नांदणी, शिरढोण, हिरोली