Kolhapur Crime: डिलिव्हरी बॉयने कंपनीला घातला दोन लाखांचा गंडा, कसा केला कांड... वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:55 IST2025-10-13T18:54:54+5:302025-10-13T18:55:15+5:30
बनावटगिरी अंगलट आली, डिलिव्हरी बॉयसह दोघांवर गुन्हा

संग्रहित छाया
कोल्हापूर : फ्लिपकार्ट कंपनीच्या कोल्हापुरातील डिलिव्हरी हब स्टोअरमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयने मित्राच्या मदतीने कंपनीला दोन लाख सात हजारांचा गंडा घातला. बनावट ग्राहकांच्या नावे मागवलेले दोन आयफोन, एअर पॉड आणि ॲपल वॉच घेऊन रिकामे बॉक्स कंपनीला परत पाठवत फसवणूक केली.
याबाबत कर्मचारी अभय महेश करणूरकर (रा. सिद्धार्थनगर, कोल्हापूर) आणि त्याचा मित्र अमिर सोहेल मकानदार (रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) या दोघांवर शनिवारी (दि. ११) रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय करणूरकर हा ताराबाई पार्क येथे फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी हब स्टोअरमध्ये काम करीत होता. २७ फेब्रुवारी ते १५ मे २०२५ या कालावधीत त्याने अमिर मकानदार या मित्राच्या मोबाइलवरून आकाश पाटील (रा. कोल्हापूर) आणि मित्तल (मूळ रा. कुर्ला, मुंबई, सध्या रा. कोल्हापूर) या बनावट नावाने दोन ॲपल आयफोन, एक एअर पॉड आणि एक ॲपल वॉचची ऑर्डर बुक केली.
ग्राहकांना वस्तू मिळाल्यानंतर पैसे देण्याचा पर्याय त्यांनी बुकिंगवेळी निवडला होता. ऑर्डर केलेल्या वस्तू कंपनीच्या स्टोअरमध्ये येताच करणूरकर याने डिलिव्हरीसाठी त्या ताब्यात घेतल्या. त्यातील वस्तू काढून घेतल्या. पार्सल पुन्हा पॅक करून संबंधित ग्राहक मिळत नसल्याचे कारण देत त्यांनी चारही वस्तूंचे पार्सल स्टोअरमध्ये जमा केले.
कंपनीच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस येताच अधिकारी प्रकाश रतिलाल शहा (६४, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी डिलिव्हरी बॉय करणूरकर आणि त्याच्या मित्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दोन्ही संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बनावटगिरी अंगलट आली
करणूरकर याने बनावट ग्राहकाच्या नावे सुरुवातीला एक मोबाइल मागवला. रिकामे पार्सल स्टोअरमध्ये जमा करून यंत्रणेचा अंदाज घेतला. कंपनीकडून तातडीने काहीच प्रतिक्रिया आली नसल्याने त्याने पुन्हा बनावट ग्राहकांच्या नावाने तीन ऑर्डर बुक करून फसवणूक केली. मात्र, त्याची बनावटगिरी उघडकीस येताच गुन्हा दाखल झाला.