Kolhapur Crime: गुंतवणूकदारांना ७५ लाखांची फसवणूक, दाम्पत्य तीन महिन्यांपासून फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:57 IST2025-08-23T17:57:16+5:302025-08-23T17:57:48+5:30
अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता

Kolhapur Crime: गुंतवणूकदारांना ७५ लाखांची फसवणूक, दाम्पत्य तीन महिन्यांपासून फरार
कोल्हापूर : शेअर्स मार्केट, कमोडिटी मार्केट ट्रेडिंग व्यवसायात जादा परताव्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने ७५ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. प्रसाद विनायक धर्माधिकारी, अश्विनी प्रसाद धर्माधिकारी (दोघेही रा. मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत.
या प्रकरणी विजय नामदेव पोळ (वय ५३, रा. बी वॉर्ड, जवाहरनगर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली. दाम्पत्य गेल्या तीन महिन्यांपासून पसार झाले असून, फसवणुकीचा आकडा कोट्यवधीत जाण्याची शक्यता आहे.
जुना राजवाडा पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा हा प्रकार २ डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२५ पर्यंत घडला आहे. संशयितांचे मंगळवार पेठेत एंजल ब्रोकिंग शेअर्स मार्केट आणि कमोडीटी मार्केट ट्रेडिंग नावाचे कार्यालय आहे. दोघेही हा व्यवसाय चालवितात. फिर्यादी आणि त्याचे दोन भाऊ चंद्रकांत, रमेश यांना शेअर्स मार्केट आणि कमोडीटी मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखविले. पहिले काही दिवस त्यांना वेळेवर परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिघा पोळ बंधूंनी ९५ लाख रुपये इतकी रक्कम गुंतवणुकीसाठी दिली.
या रकमेवर १९ लाख १० हजारांची रक्कम परतावा म्हणून दिली. मात्र, त्यातील उर्वरित ७५ लाख ९० हजारांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. गेल्या सहा महिन्यांपासून फिर्यादी त्याच्याकडे गुंतवणूक केलेली रक्कम परत मागत होते; मात्र आरोपींनी भूलथापा मारून काही दिवसांनी देतो, असे सांगितले. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून तो पत्नीसह फरार झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोळ यांनी फिर्याद दाखल केली.
सोलापुरात चौकशी
आरोपी दाम्पत्य तीन महिन्यांपासून पसार झाले आहे. त्यांच्या मंगळवार पेठेतील घरी आई, वडील राहतात. प्रसाद धर्माधिकाऱ्याच्या पत्नीचे माहेर सोलापूर आहे. पोलिसांनी सोलापूर येथे संपर्क साधला. मात्र, त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आले होते. मात्र, सध्या ते कोठे गेले याची माहिती नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.
१२ वर्षांपासून व्यवसायात
धर्माधिकारी पती-पत्नी गेल्या बारा वर्षांपासून एंजल ब्रोकिंगचा अधिकृत सबब्रोकर आहेत. अनेक ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांनी गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. सुमारे दीड ते दोन कोटी रुपये त्यांनी गुंतवणूकदारांकडून गोळा केले आहेत. मात्र, त्याचा परतावा वेळेवर दिला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सामान्य नागरिकही गुंतवणूकदार
मोठ्या गुंतवणूकदारांपासून ते अगदी हातगाडीवाले, फूलविक्रेते, वडापाव विक्रेते, किराणा दुकानदार अशा हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही त्याने गंडा घातला आहे.
तक्रारदारांची संख्या वाढणार
अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर अशोक दळवी, ऋषिकेश पाटील, स्वप्निल टिकारे, योगेश पोतदार यांच्यासह सुमारे दहा ते बारा जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. सुमारे ५० गुंतवणूकदारांची फसवणूक केली असल्याची शक्यता काही जणांनी पोलिसांसमोर व्यक्त केली आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
कर्जाची रक्कम शेअर मार्केटमध्ये
धर्माधिकारी हा एका बँकेचा बीसी पॉइंट चालवीत होता. त्या माध्यमातून त्याने ग्राहकांना कर्ज वितरित करून तीच रक्कम शेअर मार्केटमध्ये वळविली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.