ठाकरे गटाकडून सादर केलेली प्रतिज्ञापत्र आढळली बोगस, तपासासाठी मुंबई पोलीस दलाचे पथक कोल्हापुरात
By सचिन भोसले | Updated: October 12, 2022 14:08 IST2022-10-12T14:07:30+5:302022-10-12T14:08:01+5:30
राज्यातील चार जिल्ह्यात एकाच वेळी अशी विविध पथके दाखल

ठाकरे गटाकडून सादर केलेली प्रतिज्ञापत्र आढळली बोगस, तपासासाठी मुंबई पोलीस दलाचे पथक कोल्हापुरात
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्या संदर्भात मुंबईच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईपोलिसांचे चार जणांचे पथक आज, बुधवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले.
याप्रकरणी राज्यातील चार जिल्ह्यात एकाच वेळी अशी विविध पथके दाखल झाली आहेत. प्रत्येक पथकात चार अधिकारी आहेत. ते प्रत्येक जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा देणारी शपथपत्र सत्य की असत्य आहेत याबाबत चौकशी करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात चौदाशे ते पंधराशे इतकी शपथपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांनी दिली. ही बाब न्यायप्रविष्ठ आहे असून याबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली. यानंतर राज्यात सत्तांतर होवून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यातच शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगासमोर असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले जात आहेत. यात काही बनावट प्रतिज्ञापत्र असल्याचे समोर आले. या प्रकरणी मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.