Kolhapur- अवैध गर्भलिंग प्रकरण: कारवाईची कुणकुण लागताच अनेकजण जाळ्यातून निसटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:18 IST2024-12-21T12:18:07+5:302024-12-21T12:18:33+5:30
रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आव्हान

Kolhapur- अवैध गर्भलिंग प्रकरण: कारवाईची कुणकुण लागताच अनेकजण जाळ्यातून निसटले
कोल्हापूर : अवैध गर्भलिंग व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पीसीपीएनडीटी समितीला गुरुवारी काही प्रमाणात यश मिळाले. मात्र, कारवाईची कुणकुण लागताच आणखी काही जण कारवाईच्या जाळ्यातून निसटले. त्यामुळे या रॅकेटचे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील जाळे उद्ध्वस्त करण्याचे एक मोठे आव्हान आहे. गुरुवारच्या कारवाईत पकडलेले डॉक्टरसह तंत्रज्ञ बोगस असल्याचे तपासातून समोर आले आहे.
कोल्हापूर शहर परिसरात फुलेवाडी व जोतिबा डोंगर येथे डॉ. डी. बी. पाटील यांच्यासह काही जण अवैध पद्धतीने गर्भलिंग निदान व गर्भपात करत असल्याचे माहिती पीसीपीएनडीटी समितीला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी समिती सदस्य, महापालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तिघा जणांना रंगेहात पकडले होते; परंतु या कारवाईची माहिती समाजमाध्यमावरून पसरल्याने कारवाई अर्धीच सफल झाली. अन्य अनेकजण या कारवाईच्या कचाट्यातून निसटले.
विशेष म्हणजे या कारवाईत सापडलेले डी. बी. पाटील (राजलक्ष्मीनगर), बजरंग श्रीपती जांभिलकर (महाडिकवाडी, पन्हाळा), गजेंद्र ऊर्फ सनी बापूसाहेब कुसाळे (सिरसे, ता. राधानगरी) हे तिघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नाहीत. त्यांना कसलाही अनुभव नाही. या सर्वांनी बेळगाव येथे तीन लाख रुपयांस चायना बनावटीचे जुने सोनोग्राफी मशीन विकत घेतले होते.
या तिघांचे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत मोठे रॅकेट आहे. या रॅकेटकडे गिऱ्हाईक आले की, रुग्णांच्या घरी जाऊन गर्भपातावर औषधे देत असत; तसेच गर्भलिंग निदान करत होते.
पाटील हा बोगस डॉक्टर आहे, त्याने चार लाख रुपये देऊन बोगस प्रमाणपत्रे मिळविली आहेत. जांभिलकर हा अभियंता असून, त्याला मशिनरी दुरुस्तीचा अनुभव आहे. सनी कुसाळे हा यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या कारवाईत अटक झाला होता.
भीतीने पंच गेले पळून
या घटनेचा गुरुवारी पंचनामा करतेवेळी दोन सरकारी पंच पळून गेले. ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर वरिष्ठांनी नोकरी जाईल, अशा शब्दात दम दिल्यानंतर ते पंचनाम्याच्या ठिकाणी हजर झाले.
एक लाख रुपयांचे बक्षीस
समाजात अशा प्रकारे अवैध गर्भपात तसेच गर्भलिंग निदान कोणी करत असेल आणि त्यांची माहिती पीसीपीएनडीटी समितीला माहिती दिली तर कारवाई झाल्यानंतर माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षीस सरकारच्या वतीने दिले जाते.