कोल्हापुरातील गंगावेशमध्ये बाजारात कार घुसली, एका महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:49 IST2025-10-14T12:32:37+5:302025-10-14T12:49:48+5:30
वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली

कोल्हापुरातील गंगावेशमध्ये बाजारात कार घुसली, एका महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : दिवाळी सणाच्या तोंडावर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी असतानाच कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील बाजारपेठेत वडाप वाहतूक करणारी कार घुसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर आणखी काही महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत अन् जखमी महिलांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. आज, मंगळवार (दि.१४) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
गंगावेश परिसरात शाहू उद्यान परिसरात भाजी मडंईचा बाजार भरतो. ग्रामीण भागातून शेतकरी याठिकाणी भाजी विक्रीसाठी येत असतात. यामुळे परिसरात नेहमी वर्दळ असते. दरम्यानच दिवाळीचा सण तोंडावर असल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच एक वडाप वाहतूक करणारी कार बाजारात घुसल्याने भीषण अपघात झाला. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.