कोल्हापूर: अंबप येथे विवस्त्र सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, ओळख पटविण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:16 IST2022-08-25T12:32:25+5:302022-08-25T13:16:56+5:30
शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

कोल्हापूर: अंबप येथे विवस्त्र सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, ओळख पटविण्याचे आव्हान
सुहास जाधव
पेठवडगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथे ऊसाच्या शेतात विवस्त्र सडलेला मृतदेह मिळून आला. याप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. हा मृतदेहाची ओळख पटविण्याचे व तपासाचे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान आहे.
अंबप येथे बुडकी मळा येथील गट नं. १०५४ मधील शिवकांत भाऊसो पाटील यांच्या शेतामधील पाण्याच्या पाटामध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह काल, बुधवारी सायंकाळी आढळला. पोलीस पाटील हरिष गायकवाड यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. खूनाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला मात्र, यात पोलिसांना यश आले नाही.
या प्रकरणी पोलिसांनी खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. अज्ञाताचा मृतदेह कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजाणे यांनी तपासास मार्गदर्शन केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.