‘ठिबक’चे ७ कोटींचे अनुदान थकले, दीड वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत; कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:42 IST2024-12-12T12:41:19+5:302024-12-12T12:42:08+5:30

आयुब मुल्ला खोची (जि. कोल्हापूर ) : ‘ठिबक’च्या अनुदानाची रक्कम आज, उद्या मिळेल असे म्हणत प्रतीक्षेत असलेला जिल्ह्यातील शेतकरी ...

7 crore subsidy of Drip Irrigation Yojana of Kolhapur district has expired | ‘ठिबक’चे ७ कोटींचे अनुदान थकले, दीड वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत; कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र 

‘ठिबक’चे ७ कोटींचे अनुदान थकले, दीड वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत; कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र 

आयुब मुल्ला

खोची (जि. कोल्हापूर) : ‘ठिबक’च्या अनुदानाची रक्कम आज, उद्या मिळेल असे म्हणत प्रतीक्षेत असलेला जिल्ह्यातील शेतकरी वैतागून गेला आहे. दीड वर्षापूर्वी स्वत:च्या पैशाने शेतात ठिबक संच बसवून शासनाकडे आमचे हक्काचे अनुदान द्या, म्हणायची वेळ आली आहे. अनुदानाची घोषणा शासन करते; पण ते वेळेत देत नाही याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. 

जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांचे अंदाजे सात कोटींचे अनुदान अद्याप दिलेले नाही. यामध्ये सर्वाधिक शेतकरी हातकणंगले तालुक्यातील आहेत. शासन एकीकडे पाणी वाचवा, ठिबक वापरा असा नारा देते, तर दुसरीकडे अनुदानाची रक्कम वर्ष-दीड वर्ष देत नसेल तर ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशीच शासनाच्या याेजनांची अवस्था झाली आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५५ टक्के व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून २५ टक्के अनुदान ठिबकसाठी मिळते. यामुळे अनुदानावर आधारित योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ठिबक संच बसविले.

त्यासाठी सर्वप्रथम स्वतःजवळील पैशांची गुंतवणूक केली. कृषी विभागाला माहिती सादर केली. अनुदान तत्काळ मिळेल अशी अपेक्षा ठेवली; परंतु अनुदान मिळण्यास उशीर होत आहे. सुमारे २ हजार ४४५ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संच शेतात बसविले. त्यातील सुमारे ९०० शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी ऑक्टोबरमध्ये अनुदान मिळाले; परंतु १,५४४ शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. ही रक्कम ७ कोटी ५ लाख रुपये आहे. कृषी विभागाकडे चौकशी करून हेलपाटे मारून शेतकरी वैतागला आहे.

लॉटरी पद्धतीने निवड

लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते. गतवेळचे अनुदान मिळाले नसल्याने यावर्षी लाभार्थी निवड झालेली नाही. विशेष म्हणजे लाभार्थी निवड झाली की लगेच एका महिन्यात ठिबक संच बसवावे लागते. शेतकरी पैशाची जमवाजमव करून संच बसवितो. परंतु, अनुदान वर्षभर मिळत नाही.

Web Title: 7 crore subsidy of Drip Irrigation Yojana of Kolhapur district has expired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.