समीर देशपांडेकोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १४०० किलोमीटरच्या रस्त्यांकडेला आता साठ हजार कदंब, गुलमोहराची झाडे फुलणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या ही झाडे लावण्याची मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत या पावसाळ्यात ११ हजार झाडे लावून झाली आहेत.अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी दुतर्फा असणारी झाडे तोडली गेली आहेत. अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचेही रुंदीकरण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर या रस्त्यांच्या दुतर्फा देशी झाडे लावण्याची योजना या विभागाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे.त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ५४१ किलोमीटरच्या रस्त्याच्या दुतर्फा २९ हजार तर सांगली जिल्ह्यातील ८५५ किलोमीटर रस्त्यांवर २९ हजार २८८ झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी प्रतिझाड ४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.देशीच, ८ फूट उंचीचीही झाडे लावताना ती देशीच लावावीत आणि ८ फूट उंचीची लावावीत असे बंधन घालण्यात आले आहे. या उंचीची झाडे लावल्यानंतर जनावरांपासून त्यांचे संरक्षण होते. या बंधनामुळे गुलमोहर, कदंब, करंजी, कडुनिंब, पिंपळ या झाडांना प्राधान्य देण्यात आले आहे. या झाडांच्या खोडांचा घेर ८ सेंटीमीटर हवा असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
रस्ता आणि झाड दिसेल असा फोटोयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगळे पोर्टलच सुरू केले असून त्यावर रोज झाडे लावलेली नोंद होत आहे. झाड लावल्यानंतर प्रत्येकी तीन महिन्यांचे रस्ता दिसेल असे फोटो अपलोड करावयाचे असून तीन वर्षे संबंधित ठेकेदाराने या झाडांची देखभाल करावयाची आहे. कुठेही झाड लावले आणि त्याचे फोटो काढले असे होऊ नये यासाठीच संबंधित रस्ता दिसेल असे फोटो अपलोड करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या दुतर्फा ही झाडे लावली जात आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातील १५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ११ शासकीय इमारतींच्या आवारातही १७०० झाडे लावण्यात आली आहेत. तीन वर्षे ही झाडे जगवण्याची जबाबदारी ठेकेदारावर आहे. - तुषार बुरूड, अधीक्षक अभियंता, कोल्हापूर विभाग