कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतींसाठी ५०४ अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:08 IST2025-11-17T12:08:13+5:302025-11-17T12:08:45+5:30
Local Body Election: एकमेकांचा राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी माघारीपर्यंत अनेक उलाढाली होणार

कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतींसाठी ५०४ अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस
कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी मोठ्या संख्येने म्हणजे ५०४ अर्ज दाखल झाले; तर नगराध्यक्षपदासाठी ३६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आजपर्यंत एकूण १२२७ जणांनी नगरसेवकपदासाठी, तर नगराध्यक्षपदासाठी एकूण ९६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आज, सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींची निवडणूक लागली असून राजकीय आघाड्याही अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी महायुतीमध्ये फूट पडली असून महाविकास आघाडीही काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अतिशय अटीतटीच्या होणाऱ्या या निवडणुकांसाठी इच्छुकांचीही संख्या वाढली आहे. एक तर राज्यात चार पक्षांचे सहा पक्ष झाल्याने आणि स्थानिक राजकारणात उतरण्याची इच्छा असलेल्या युवकांचीही मोठी संख्या असल्याने अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट, काॅंग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, उद्धवसेना, जनसुराज्य पक्ष, स्वाभिमानी पक्ष प्रामु्ख्याने सक्रिय असून आता या निवडणुकांमध्ये पक्षीय भेद न पाळता काही ठिकाणी स्थानिक आघाड्याही आकाराला आल्या आहेत.
रविवारी अर्ज दाखल केलेली संख्या एकूण अर्ज
नगरपालिका - सदस्यपदासाठी अर्ज - अध्यक्षपदासाठी अर्ज
- जयसिंगपूर - ५३ (१२३) - २ (८)
- मुरगूड - ४८ (१९२) - १ (१२)
- कागल - ४६ (१८८) - ५ (१२)
- शिरोळ - ४१ (७८) - ४ (५)
- गडहिंग्लज - ४० (९६) - ४ (१२)
- हुपरी - ४० (४२) - ०० (००)
- कुरुंदवाड - ३६ (९३) - १ (८)
- पन्हाळा - ३३ (५३) - ४ (५)
- वडगाव - ३१ (४२) - ४ (५)
- मलकापूर - १८ (५८) - १ (४)
नगरपंचायत
- आजरा - ४५ (९९) - ४ (१३)
- चंदगड - ४२ (८८) - ६ (८)
- हातकणंगले - ३१ (७५) - ०० (०४)
नेतेमंडळींची धावपळ
अर्ज दाखल करण्याचा आज, सोमवार शेवटचा दिवस असल्याने नेतेमंडळींचीही धावपळ सुरू आहे. एकमेकांचा राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी माघारीपर्यंत अनेक उलाढाली होणार असल्याने अर्ज भरून ठेवा अशा सूचना नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.