शेअर बाजारमध्ये आकर्षक परताव्याच्या आमिषाने १४ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:58 IST2020-02-21T13:56:33+5:302020-02-21T13:58:45+5:30
शेअर बाजारात गुंतवणूक करून आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने दोन लष्करी जवानांसह २0 जणांची सुमारे १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज शंकरराव मोहिते (रा. रामानंदनगर), असे त्या संशयिताचे नाव आहे.

शेअर बाजारमध्ये आकर्षक परताव्याच्या आमिषाने १४ लाखांचा गंडा
कोल्हापूर : शेअर बाजारात गुंतवणूक करून आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने दोन लष्करी जवानांसह २0 जणांची सुमारे १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज शंकरराव मोहिते (रा. रामानंदनगर), असे त्या संशयिताचे नाव आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने संशयित पृथ्वीराज मोहिते हा रकमा जमा करीत होता. एकाच अपार्टमेंटमध्ये राहत असल्याने फिर्यादी गायत्री ध्रूूव जाधव (रा. राजवीर हाईटस्, रामानंदनगर, कोल्हापूर) यांची संशयित मोहिते याच्याशी ओळख झाली. त्यातून त्यांनी मोहिते यांच्याकडे सुरुवातीला एक लाख ७० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्याचा काही प्रमाणात परतावाही दिला. याच ओळखीतून जाधव यांच्या पतीचे सहकारी, नातेवाईक अशा २० जणांकडून त्याने एक ते दोन लाखांची रक्कम गुंतवणुकीच्या नावाने घेतली.
एकदा पैसे दिल्यानंतर सात महिने त्याने गुंतवणुकीचा कोणताही परतावा दिला नाही. जाधव व त्यांच्या नातेवाइकांनी मोहिते याच्याकडे वारंवार रक्कम परत करण्याची मागणी केली. त्यावेळी मोहिते याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मोहिते याने गुंतवणूकदारांना धमकावण्याचा प्रकारही केल्याचे तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले.
एकूण १४ लाख, १० हजार रुपये घेऊन मोहितेने फसवणूक केल्याची फिर्याद करवीर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मोहिते याने आणखी किती जणांकडून अशा प्रकारे रक्कम घेतली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.