कोल्हापूरात घोटवडेजवळ अपघातात ४ कामगार तरुण ठार, १२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 15:03 IST2019-07-10T13:15:17+5:302019-07-10T15:03:11+5:30
गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे कामगारांना घेवून जाणाऱ्या क्रुझर जीप आणि डंपरची कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर घोटवडे येथील स्वयंभू मंदिरानजीक समोरासमोर धडक होवून झालेल्या भिषण अपघातात चालकासह चौघेजण जागीच ठार झाले. तर बाराजण गंभीर जखमी झाले. जखमींवर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करुन खासगी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही दूर्देवी घटना घडली. कर्त्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने जिल्हा शोकसागरात बुडाला.

कोल्हापूरात घोटवडेजवळ अपघातात ४ कामगार तरुण ठार, १२ जखमी
कोल्हापूर/भोगावती : गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे कामगारांना घेवून जाणाऱ्या क्रुझर जीप आणि डंपरची कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर घोटवडे येथील स्वयंभू मंदिरानजीक समोरासमोर धडक होवून झालेल्या भिषण अपघातात चालकासह चौघेजण जागीच ठार झाले. तर बाराजण गंभीर जखमी झाले. जखमींवर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करुन खासगी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही दूर्देवी घटना घडली. कर्त्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने जिल्हा शोकसागरात बुडाला.
चालक साताप्पा बळवंत गुरव (वय ३०, रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी), प्रकाश मारुती एकावटे (४८, रा. पिरळ, ता. राधानगरी), ऋषीकेश राजेंद्र पाटील (२३), कृष्णात दिनकर गुरव (२३, दोघे रा. कसबा तारळे, ता. राधानगरी) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळावरील दृष्य अंगावर शहारे आनणारे होते. चालक गुरव याचा मृतदेह ओढून बाहेर काढला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. डंपरचालक भितीने पसार झाला. या अपघातामुळे सकाळपासून तीन तास कोल्हापूर-राधानगरी आणि तेथून कोकणात जाणारी वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूकीची कोंडी झाली. राधानगरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला घेवून वाहतूक सुरळीत केली.
प्रवासी जीप (एम. एच. ०९ ईयू-४७४४) बुधवारी पहाटे साडेसहाला राधानगरीहून गोकुळशिरगाव एमआयडीसीकडे येत होती. जीपमध्ये १६ कामगार होते. घोटवडे फाटा स्वयंभू मंदिरानजीक येताच समोरुन डंपरची (एम. एच. ०९ ई. एम. ४५८४) धडक झाली. यावेळी मोठा आवाज होऊन क्रझरजीपचा चक्काचूर झाला. कामगार चिरडले गेले, तर एकमेकांच्या अंगावर, काहीजण दहा ते पंधरा फूट उडून बाजूला पडले. कुणाच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांचा आक्रोशाने कोणालाच काय करावे ते सुचत नव्हते.
भेदरलेल्या जखमींचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेत तातडीने इस्पुली, राशिवडे, राधानगरी येथील १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. जखमी कामगार पिरळ, शिरोली, तारळे, कुडूत्री, आणाजे, आवळी परिसरातील असल्याने येथील नातेवाईक व मित्रांनी अपघातस्थळासह सीपीआरकडे धाव घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सीपीआर आणि खासगी रुग्णालयात भेट देवून अपघाताची माहिती घेत जखमींची विचारपूस केली.
जखमी नावे अशी,
रामचंद्र गणपती पेंडे (वय ३० रा. पिरळपैकी दुबलवाडी), रंगराव दत्तात्रय चौगुले (४०), सूरज गणपती पाटील (३५), अमोल सुरेश आसवेकर (२१, तिघे, रा. पिरळ), उत्तम दिनकर तिबिले (३५), संदीप गणपती पाटील (२७), संदीप दत्तात्रय हुजरे (३०, तिघे रा. आणाजे), राहुल सुरेश पाटील (२४), अमित कुंडलीक चौगुले (२७, दोघे, रा. आवळी ब्रुद्रक), साताप्पा श्रीपती चौगुले (३०), सागर आनंदा पाटील (२७ दोघे, रा. कुडूत्री), अनिल मधुकर चौगुले (२५, रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी).