कोल्हापूर, सांगलीतील ३० मीटरच्या आतील वीज जाेडण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:05+5:302021-02-05T06:58:05+5:30

कोल्हापूर : नव्या कृषीपंप वीज जाेडणी धोरणाचे चांगले परिणाम दिसत असून अवघ्या १५ दिवसांत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३० ...

30 meters inside Kolhapur, Sangli completed | कोल्हापूर, सांगलीतील ३० मीटरच्या आतील वीज जाेडण्या पूर्ण

कोल्हापूर, सांगलीतील ३० मीटरच्या आतील वीज जाेडण्या पूर्ण

कोल्हापूर : नव्या कृषीपंप वीज जाेडणी धोरणाचे चांगले परिणाम दिसत असून अवघ्या १५ दिवसांत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३० मीटरच्या आतील सर्व २४७२ वीज जोडण्या पूर्ण करण्यात महावितरणला यश आले आहे. आता ३० मीटरच्यावरील व २०० मीटरच्या आतील वीज जोडण्यांचे सर्वेक्षण सुरू झाले असून पंधरा दिवसांनी त्याच्याही जोडण्या सुरू होणार आहेत. त्यामुळे गेली चार वर्षे थांबलेली कृषीपंप वीज जोडणीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असल्याने शेतकऱ्यांची शेतात पाणी पडण्याची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे.

राज्य सरकारने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रलंबित कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी नवे धोरण आणले. यानुसार १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरुनदेखील प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीचे तीन टप्पे करण्यात आले. पहिला टप्पा ३० मीटरच्या आतील, दुसरा २०० मीटरच्या आतील तर तिसरा ६०० मीटर असा निश्चित करण्यात आला. पहिला टप्पा २६ जानेवारीला पूर्ण होईल असे लक्ष्य ठेवण्यात आले. महावितरणला १५ दिवसांत हे लक्ष्य साध्य करण्यात यश आले आहे. आता पुढील टप्प्यासाठीची सर्वेक्षण मोहीम सुरू होत आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगेचच जोडण्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. २०० मीटरच्यावरील आणि ६०० मीटरपर्यंत वीज जोडण्या असलेल्यांना सौर कृषीपंपाचाच पर्याय दिला जाणार आहे. कारण पारंपरिक वीज जाेडणीचा पर्याय महावितरणच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीला परवडणारा नाही.

चाैकट ०१

जिल्हा प्रलंबित जोडण्या पूर्ण झालेल्या जोडण्या

कोल्हापूर ६१४० १४६३

सांगली ६३४७ १००९

एकूण १२४९५ २४७२

चौकट ०२

कोल्हापूर व सांगलीत अद्याप १० हजार २३ जण वीज जोडणीच्या प्रतीक्षेत.

चौकट ०३

ज्येष्ठता यादीनुसार वीज जोडण्या

बोअर मारून, विहीर खाेदून, नदीपासून पाईपलाईन टाकून शेतकरी चार वर्षांपासून केवळ वीज जोडणी मिळत नाही म्हणून पैसे भरून प्रतीक्षेत बसले आहेत, पण त्यांना जोडणी मिळत नव्हती. आता आर्थिक तरतुदीच्या उपलब्धतेनुसार आणि मागणीच्या ज्येष्ठतेनुसार वीज जाेडण्या देण्याचे धोरण आहे. येत्या तीन महिन्यांत बऱ्यापैकी प्रलंबित वीज जाेडण्या पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पडेल असे नियोजन आहे.

Web Title: 30 meters inside Kolhapur, Sangli completed