Kolhapur: ‘केडीसीसी’च्या वारणानगर शाखेत ३.२१ कोटी अपहार; चौघांना अटक, एक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:32 IST2025-04-30T12:28:30+5:302025-04-30T12:32:23+5:30

आठ महिन्यांनंतर कारवाई 

3 crores stolen from Kolhapur District Central Cooperative Bank Warnanagar branch Four arrested | Kolhapur: ‘केडीसीसी’च्या वारणानगर शाखेत ३.२१ कोटी अपहार; चौघांना अटक, एक फरार

Kolhapur: ‘केडीसीसी’च्या वारणानगर शाखेत ३.२१ कोटी अपहार; चौघांना अटक, एक फरार

कोडोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर (ता. पन्हाळा) शाखेत ग्राहकांच्या खात्यातून परस्पर रक्कमा काढून ३ कोटी २१ लाख ९१ हजार ६१९ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पोवार (कळे, ता. पन्हाळा), लिपीक मुकेश विलास पाटील (मसूद माले, ता. पन्हाळा), कॅशिअर शिवाजी शहाजी पाटील (आरळे, ता. पन्हाळा), मिनाक्षी भगवान कांबळे व शरिफ मुम्ताज मुल्ला (दोघेही कोडोली, ता. पन्हाळा) यांच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला. यापैकी पोवार अद्याप फरार असून, चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

तानाजी पोवार, मुकेश पाटील यांच्यासह पाच जणांनी संगनमताने पे स्लीप, धनादेशावर बोगस सह्या करून, खातेदारांच्या नावावरील पैसे काढून घेतल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांचा युजर आयडी, पासवर्ड वापरून पैसे काढले आहेत. पाच जणांच्या विरोधात बँकेचे उपव्यवस्थापक बाळासो हरी बेलवळेकर (वय ५८, कुरुकली ता. कागल) यांनी कोडोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे सोपवला आहे.

तीन वर्षे सुरू होता अपहार

तीन कोटी २१ लाखांचा अपहार होत असताना, बँकेची तपासणी यंत्रणा काय करत होती? १५ जुलै २०२१ ते २० ऑगस्ट २०२४ असे तीन वर्षे संगनमताने अपहार सुरू होता.

राजकीय दबावापोटी कारवाई लांबली

वारणानगर शाखेतील अपहार बँकेच्या यंत्रणेला ऑगस्ट २०२४ मध्ये लक्षात आला. पण, राजकीय दबावापोटी संबधितांवर वेळेत कारवाई झाली नसल्याची चर्चा बँक वर्तुळात सुरू आहे.

झारीतील शुक्राचार्य मोकळाच

बँकेतील वादग्रस्त सेवानिवृत्त अधिकारी वारणानगर शाखेत रोज तळ ठोकूनच बसलेले असायचे. या प्रकरणातील झारीतील खरे शुक्राचार्य तेच असून, ते मोकळेच असल्याची चर्चा वारणानगर परिसरात सुरू आहे.

Web Title: 3 crores stolen from Kolhapur District Central Cooperative Bank Warnanagar branch Four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.