Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेला २६ हजार नव मतदारांवर गंडातर
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 15, 2026 19:30 IST2026-01-15T19:28:35+5:302026-01-15T19:30:40+5:30
२० ते २९ वयोगटात सर्वाधिक मतदार

Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेला २६ हजार नव मतदारांवर गंडातर
इंदुमती गणेश
कोल्हापूर : एक जुलैनंतर नोंदणी केलेले जिल्ह्यातील २५ हजार ७३९ मतदार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाला मुकणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलैपर्यंत झालेली मतदार यादी या निवडणुकीसाठी पात्र ठरवल्याने नोंदणीनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत. १ जुलैनंतर तब्बल सहा महिन्यांनी निवडणूक होत असताना किमान ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणे अपेक्षित होते. एका बाजूला मतदान नोंदणीसाठी निवडणूक यंत्रणा सगळी ताकद लावतात आणि ज्यांनी मतदान नोंदणी केली त्यांना मात्र या हक्कापासून वंचित ठेवतात असा उफराटा अनुभव येत आहे. त्याबद्दल लोकांत संतप्त प्रतिक्रिया आहेत.
आधी नगरपालिका, सध्या सुरू असलेली महापालिका आणि पुढील महिन्यात होत असलेली जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला किती तारखेपर्यंत झालेली मतदार नोंदणी ग्राह्य धरू शकतो याचे अधिकार दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही तारीख १ जुलै ठरवली. त्यानंतर तब्बल ५ महिन्यांनी नगरपालिका निवडणूक झाली, सहा महिन्यांनी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्यासाठी किमान ३ महिने आधीची मतदार यादी ग्राह्य धरणे अपेक्षित होते.
लोकसभा-विधानसभेला उमेदवारी अर्जापर्यंत
लोकसभा विधानसभा निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरण्याच्या आठ ते दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी सुरू होती. नंतर पुरवणी यादी जोडली गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांना मात्र १ जुलैनंतर कटऑफ मारला गेला आहे.
स्थानिक पातळीवर चुरस अधिक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गावागावातील, तालुक्यांमधील राजकारणात टोकाची ईर्ष्या असते. एक एक मतासाठी उमेदवार झटतो कारण त्यावर निकाल फिरतात. दुसरीकडे प्रशासन मतदान वाढावे यासाठी कसोशीने प्रयत्न करत असताना इथे मात्र एवढ्या मोठ्या संख्येने मतदार मतदान करू शकणार नाही.
तालुका : २ जुलै ते १२ जानेवारीपर्यंत झालेले मतदार
तालुका : १८-१९ : २०-२९ : ३० वर्षावरील : एकूण
शिरोळ : ५२९ : १८४१ : १०९० : ३४६०
कोल्हापूर दक्षिण : २९८ : १४३८ : १४५४ : ३१९०
इचलकरंजी : ३१९ : १७५५ : १११० : ३१८४
हातकणंगले : ४०७ : १७८४ : ८५८ : ३०४९
करवीर : ३८७ : १५७१ : ७५९ : २७१७
चंदगड : २५२ : १३७६ : ९११ : २५३९
शाहुवाडी : २६४ : १२२१ : ६५४ : २१३९
राधानगरी : ३११ : ११७२ : ४९९ : १९८२
कोल्हापूर उत्तर : १८२ : ८९७ : ७३२ : १८११
कागल : २३० : ९३० : ५०८ : १६६८
एकूण : ३ हजार १७९ : १३ हजार ९८५ : ८ हजार ५७५ : २५ हजार ७३९
शिरोळमध्ये सर्वाधिक मतदार
१ जुलैनंतर झालेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक ३ हजार ४६० मतदार शिरोळमध्ये, त्यानंतर कोल्हापूर दक्षिणमध्ये ३ हजार १९० इचलकरंजीमध्ये ३ हजार १८४ मतदार आहेत.
२० ते २९ वयोगटात सर्वाधिक मतदार
नव्याने झालेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक १३ हजार ९८५ मतदार हे २० ते २९ वयोगटातील तर ३ हजार १७९ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील आहेत. म्हणजेच मतदान करू न शकणाऱ्यांमध्ये नवमतदारांची संख्या अधिक आहे.