ST Buses: कोल्हापूर-पुणे मार्गावर आजपासून दिवाळीनिमित्त २३५ जादा बसेस; खासगी बसेसकडून लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:24 IST2025-10-15T12:20:35+5:302025-10-15T12:24:32+5:30
एसटी महामंडळाचे सर्वच प्रमुख मार्गांवर नियोजन

संग्रहित छाया
कोल्हापूर : महाराष्ट्र्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आज, बुधवारपासून दिवाळीनिमित्त जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे - कोल्हापूर मार्गावर नियमित बसेसशिवाय तब्बल २३५ जादा बसेस धावणार आहेत. प्रवाशांची संख्या प्रचंड असल्याने त्यांची सोय आणि उत्पन्नही मिळवण्यासाठी महामंडळाने ५ नोव्हेंबरपर्यंत जादा बसेसचे नियोजन केले आहे.
वर्षातील महत्त्वाचा सण असल्याने दिवाळीसाठी चाकरमानी गावाकडे सहकुटुंब येतात. शाळांनाही सुटी पडलेली असते. यामुळे बसेसना प्रचंड गर्दी असते. यामुळे पुणे - कोल्हापूर, मुंबई, परेल, बोरीवली, बदलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, निगडी, वल्लभनगर, रत्नागिरी, सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, लातूर, बेळगाव यासह ग्रामीण भागातही जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.
दिवाळीसाठी गावी येण्यासाठी आणि परत जाण्यासाठीही जादा बसेस मार्गस्थ राहणार आहेत. जादा वाहतुकीच्या सर्व फेऱ्या ऑनलाइन आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. प्रवाशांनी महामंडळाच्या बसस्थानकावरील आरक्षण केंद्र, वेब पोर्टल, मोबाइल ॲप सुविधेद्वारे आपली तिकिटे आगाऊ आरक्षित करावे, असे आवाहन महामंडळाच्या प्रशासनाने केले आहे.
आवडेल तेथे प्रवास
दिवाळीच्या कालावधीत महामंडळाने चार, सात दिवस आवडेल तेथे प्रवास योजनेचाही प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. यासाठी सवलतीच्या दरात पासही देण्यात येणार आहे.
खासगी बसेसकडून लूट
कोल्हापूरहून पुणे, मुंबईसह सर्वच प्रमुख शहरात अनेक खासगी बसेस धावतात. त्यांनीही दिवाळीनिमित्त दर वाढवले आहेत. जादा पैसे देईल, त्याला बुकींग दिले जात आहे. यावर कोटेकोरपणे नियंत्रण नसल्याने प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत.
पुन्हा बसस्थानक परिसरात बुलाव डाव
वाहतूक कोंडी आणि बुलाव डाव बंद होण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खासगी बसेस लावण्यास मज्जाव आहे. तरीही अनेक खासगी बसेस प्रवासी चढ, उतार करण्याच्या नावाखाली बसेस लावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सायंकाळी सातनंतर खासगी बसवाले मध्यवर्ती बसस्थानकात येऊन प्रवाशांना बोलावून घेऊन जाताना दिसतात.