Kolhapur: 'बाळूमामा'ची दीड कोटींची २३ गुंठे जमीन पुन्हा देवस्थानलाच विकली; आदमापुरातील विश्वस्तांचा व्यवहार पुन्हा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:53 IST2025-10-08T11:52:45+5:302025-10-08T11:53:21+5:30
भक्तांची राज्य धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

Kolhapur: 'बाळूमामा'ची दीड कोटींची २३ गुंठे जमीन पुन्हा देवस्थानलाच विकली; आदमापुरातील विश्वस्तांचा व्यवहार पुन्हा चर्चेत
शिवाजी सावंत
गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवस्थानाच्या विश्वस्त मंडळावर पुन्हा एकदा गंभीर आरोपांचा भडका उडाला आहे. देवस्थानासाठीच खरेदी केलेल्या जमिनीची पुन्हा वटमुखत्यारपत्र दाखवून तब्बल १ कोटी ६८ लाख २ हजार ५०० रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याची तक्रार भक्तांच्यावतीने राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे झाली असून यासह अन्य प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे.
या व्यवहाराबाबत एका भक्ताने महसूल अधिकाऱ्यांकडेही जमिनीचा फेरफार करू नये अशी हरकत घेतली आहे. आदमापूर येथील गट नंंबर १९१ मधील २३ गुंठे जमीन देवस्थानच्या निधीतून देवस्थानसाठीच परंतु सचिव रावसाहेब वीराप्पा कोणकेरी यांच्या नावावर २०१५ ते २०१६ या कालावधीत घेतली आहे. त्यावेळीच ही जमीन देवस्थानच्या नावावर न घेता ती सचिवांच्या व्यक्तिगत नावे घेतली आहे.
कोणकेरी यांनी ही जमीन सप्टेंबर २०२५ मध्ये प्रकाश पांडुरंग मांगले यांना वटमुखत्यारपत्राने विकत दिली. मांगले यांनी तीच जमीन बाळूमामा देवस्थानाला पुन्हा विकली. आणि त्याबदल्यात ३ सप्टेंबर २०२५ ला १ कोटी ६८ लाख २ हजार ५०० रुपये देवस्थानकडून स्वतःला घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तक्रार झाल्याने ग्रामस्थांनी विरोध केल्याने पैसे परत करण्यासाठी गडबड सुरू आहे. पण यातील काही कारभारी पैसे न देण्याच्या पवित्र्यात आहेत.
दीड कोटींचा व्यवहार नजरचुकीतून कसा?’
देवस्थान समितीने १ कोटी ६८ लाख रुपये कोणाच्या नावे आरटीजीएस केले..? ज्यांच्या नावावर आरटीजीएस केलेली रक्कम त्यांनी कोणाकोणाच्या खात्यात वर्ग केली की रोख दिली..? पुन्हा देवस्थानकडे पैसे वर्ग करण्यासाठी का हालचाली सुरू झाल्या आहेत..? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा व्यवहार करण्यासाठी लक्ष्मणरेषा कशी पार करायची यासाठी मार्गदर्शन करणारे भीष्म कारभारी कोण आहेत, अशी चर्चा भक्तांत आहे.
ही घटना अनवधानाने घडली आहे. जमीन देवस्थानच्या नावावर केली जाणार असून या व्यवहारापोटी कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. - रावसाहेब कोणकेरी सचिव, बाळूमामा देवस्थान समिती, आदमापूर (ता. भुदरगड)
बाळूमामा देवस्थानचीच जमीन देवस्थानलाच पुन्हा विकण्याचा प्रकार घडला आहे. आमच्यापर्यंत त्याबद्दलच्या तक्रारी आल्या आहेत. - धैर्यशील भोसले , अध्यक्ष, बाळूमामा देवस्थान समिती, आदमापूर