कोल्हापूर सर्किट बेंचसाठी १९३ जण नियुक्त, आता न्यायमूर्तींच्या नियुक्तीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:50 IST2025-08-13T11:50:09+5:302025-08-13T11:50:34+5:30
सरकारी वकील नियुक्तीत बदल

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी १९३ जण नियुक्त, आता न्यायमूर्तींच्या नियुक्तीची प्रतीक्षा
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचसाठी ६८ प्रशासकीय अधिकारी आणि १२५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली. १९३ जणांच्या नियुक्तीचा आदेश सोमवारी (दि. ११) रात्री जारी झाला. सर्किट बेंचसाठी आजपर्यंत सुमारे सव्वादोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली. आता न्यायमूर्तींच्या नियुक्तीची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. १२) दुपारी जिल्हा न्याय संकुलात खंडपीठ कृती समितीची बैठक झाली. उद्घाटन समारंभासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही समितीने जिल्हा बार असोसिएशनला दिली.
कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून अधिकार आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. सोमवारी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २४ कर्मचारी सर्किट बेंचमध्ये रुजू झाले. त्यानंतर रात्री उशिरा ८६ अधिकारी आणि १२४ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश आला.
हे सर्व कर्मचारी तातडीने हजर होणार आहेत. यात उपरजिस्ट्रार, न्यायमूर्तींचे खासगी सचिव, सहायक रजिस्ट्रार, सेक्शन ऑफिसर यासह लिपिक, स्टेनोग्राफर, शिपाई अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्किट बेंचकडे वर्ग केलेल्या खटल्यांची कागदपत्रे आणायला सुरुवात झाली आहे. आलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून त्यांचे डिजिटल डॉक्युमेंटेशन केले जात आहे.
यांची झाली नियुक्ती
उपरजिस्ट्रार - ३, न्यायमूर्तींचे सचिव - १५, सहायक रजिस्ट्रार - ४, सेन्शन ऑफिसर - १८, सहायक सेक्शन ऑफिसर - २८, लिपिक - ७०, शिपाई - ४१, लिफ्टमन - १, ग्रंथपाल - १, चोबदार - २, स्टेनोग्राफर - ४, सॉफ्टवेअर प्रोगॅमर - १, बायंडर्स - ३, फायलर - २
खंडपीठ कृती समितीची बैठक
जिल्हा बार असोसिएशनने मंगळवारी खंडपीठ कृती समितीची बैठक बोलवली होती. या बैठकीत कृती समितीला उद्घाटन समारंभाचे निमंत्रण देण्यात आले. सर्किट बेंचला मंजुरी दिल्याबद्दल कृती समितीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे आभार मानले. तसेच उद्घाटन समारंभासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
सरकारी वकील नियुक्तीत बदल
उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. ७) सरकारी वकिलांच्या नियुक्तीचा आदेश काढला होता. त्यामधील अतिरिक्त सरकारी वकील (अपिल शाखा) प्रियभूषण प्रसन्नकुमार काकडे यांच्याऐवजी ॲड. सिद्धेश्वर बाबा कालेल यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे शुद्धीपत्रक मंगळवारी (दि. १२) प्रसिद्ध झाले. तसेच मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील व मुख्य सरकारी अभियोक्ता हितेन वेणेगावकर यांच्याकडे कोल्हापूर सर्किट बेंचमधील कामाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. ॲड. वेणेगावकर मूळचे कोल्हापूरचे आहेत.
मंडपाच्या कामाला गती
सर्किट बेंच उद्घाटन समारंभ मेरी वेदर ग्राउंडवर होणार आहे. यासाठी मंडपाचे काम गतीने सुरू झाले आहे. पोलिसांनी मंगळवारी कामांचा आढावा घेतला. तसेच, समारंभस्थळी येणारे न्यायमूर्ती, मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. सुरक्षेच्या अनुषंगाने विशेष खबरदारी घेतली जात आहे.