Kolhapur: गॅस कटरने एटीएम फोडून १९ लाख लंपास, टायर फुटल्याने कार सोडून रक्कम घेऊन चोरटे पळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:06 IST2025-01-06T12:05:24+5:302025-01-06T12:06:51+5:30
चंदगड (जि. कोल्हापूर ) : गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून १८ लाख ७७ हजार ३०० रुपये लांबविल्याची घटना शनिवारी ...

Kolhapur: गॅस कटरने एटीएम फोडून १९ लाख लंपास, टायर फुटल्याने कार सोडून रक्कम घेऊन चोरटे पळाले
चंदगड (जि. कोल्हापूर) : गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून १८ लाख ७७ हजार ३०० रुपये लांबविल्याची घटना शनिवारी (४) मध्यरात्री कोवाड येथील स्टेट बँकेच्या शाखेत घडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे नाकेबंदी करून नेसरीच्या चौकात चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, बॅरिकेड्स तोडून त्यांनी कारसह पोबारा केला.
कोवाड येथील स्टेट बँकेच्या शाखेतील एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅसकटरद्वारे जाळून त्यामधील १८ लाख ७७ हजार ३०० रुपयांची रक्कम बाॅक्ससकट लंपास केली. हा प्रकार सुरू असताना ई-अलर्टमुळे हा प्रकार बँकेच्या मुख्य कार्यालयातून जिल्हा पोलिस विभागाला समजताच पोलिसांंनी आपल्या यंत्रणेसह चोरट्यांचा पाठलाग केला. त्याचवेळी नेसरी पोलिसांनी मुख्य चौकात नाकाबंदी केली. मात्र, भरधाव वेगामुळे बॅरिकेड्स तोडून चोरट्यांनी कारसह हेब्बाळच्या दिशेने पोबारा केला.
दरम्यान, चोरट्यांची कार पोलिसांच्या व्हॅनला धडकली. यामध्ये चोरट्यांच्या कारचा टायर व एअरबॅग फुटल्याने आपली कार हेब्बाळमध्येच सोडून रक्कम घेऊन पलायन केले. पोलिसांनी एमएच ०१, ईबी ९९१८ या क्रमांकाची कार ताब्यात घेतली असून कोवाड, नेसरी, हेब्बाळमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असून त्याद्वारे पोलिसांची विविध पथके तयार करून तपास चालविला आहे.