‘पीएम किसान’चा ४.७४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता, कोल्हापूर जिल्ह्यासाठी ९४.८२ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:15 IST2024-10-09T14:14:57+5:302024-10-09T14:15:37+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत १८ वा हप्ता कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ७४ हजार ...

‘पीएम किसान’चा ४.७४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता, कोल्हापूर जिल्ह्यासाठी ९४.८२ कोटी
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत १८ वा हप्ता कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ७४ हजार १२५ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे. तब्बल ९४ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मे ते ऑगस्ट या चार महिन्यांचा हा हप्ता आहे.
केंद्र सरकारने २०१९ पासून पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना महिन्याला पाचशे रुपयांप्रमाणे चार महिन्यांचे दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षातून तीन हप्ते जमा होतात. जिल्ह्यात ५ लाख ५ हजार ३५८ शेतकऱ्यांना अकरा हप्ते आले.
त्यानंतर या योजनेबाबत तक्रारी आल्यानंतर निकषानुसार पडताळणी करण्यात आली. यामध्ये सरकारी, निमसरकारी, आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची नावे उघड झाली. यामध्ये १३ हजार ८०६ लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यांची पेन्शन बंद करत असताना उर्वरित लाभार्थ्यांकडून केवायसीसह इतर पूर्तता करण्याची सक्ती केली. यामध्ये ४ लाख ७४ हजार १२५ लाभार्थी पात्र ठरले. त्यांचा अठरावा हप्ता ९४ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये खात्यावर वर्ग झाला आहे.
नवीन जमीन खरेदी करणाऱ्यांना लाभ नाही
केंद्र सरकारने ही योजना २०१९ मध्ये सुरू केली. त्यामुळे यानंतर नवीन जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. वडिलोपार्जित जमीन वारसा हक्काने नावावर झाल्यास त्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
तक्रारी काही संपेना..
पीएम किसान योजनेचे सर्वाधिकार कृषी विभागाला दिले आहेत. नवीन लाभार्थ्यांची निवड करण्याबरोबरच त्रुटींची पूर्तता करून त्यांना लाभ देण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर कृषी सहायकांवर आहे; पण त्रुटींची पूर्तता करताना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
दृष्टिक्षेपात पीएम किसान योजना
- अकराव्या हप्त्यापर्यंत पात्र शेतकरी : ५ लाख ५ हजार ३५८
- निकषानुसार अपात्र : १३ हजार ८०६
- ई-केवायसी पूर्तता न केलेले : ३ हजार २५६
- अठराव्या हप्त्यासाठी पात्र : ४ लाख ७४ हजार १२५