Pune-Bangalore Highway: १४ ब्लॅक स्पॉट, सहापदरीकरणातही वाट बिकट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:06 IST2025-09-18T19:05:46+5:302025-09-18T19:06:59+5:30
उड्डाणपूल, भुयारी मार्ग करुनही प्रवास धोकादायक

Pune-Bangalore Highway: १४ ब्लॅक स्पॉट, सहापदरीकरणातही वाट बिकट!
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरीलकोल्हापूर जिल्हा आणि बेळगावपर्यंत सहापदरीकरणाच्या कामात मोठे ब्लॅक स्पॉट काढण्यासाठी डोंगर फोडले जात आहेत. उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार केले जात आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलिस, परिवहन प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गावर चौदा अपघातप्रवण ठिकाणे निश्चित केली आहेत. येथील उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू केली आहे.
महाराष्ट्रातील सातारा ते सीमा भागातील बेळगावपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. या मार्गावरील बेळगाव जिल्ह्यातील स्तवनिधी घाट, सुतगट्टी डोंगर फोडून धोकादायक वळणे काढून कायमचे ब्लॅकस्पॉट काढले जात आहे. येथे आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूलही उभारले आहेत. कोगनोळी टोलनाका ते साताऱ्यापर्यंतही अपघात प्रवण परिसरात भुयारी मार्ग, उड्डाणपूल बांधले जात आहेत. तीव्र वळणे काढून रस्त्याची उंची एक समान केली जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील १४ ब्लॅक स्पॉटवर विविध उपाययोजना करण्यात येणार आहे.
मुरगूड नाका येथील शाळा, कॉलेज मुले महामार्गावर उलट्या दिशेने येऊ नये म्हणून संबंधित शाळा, कॉलेजला पत्र देणे, लक्ष्मी टेकडी येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधून येणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेक बसवणे, मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूस १०० मीटर अंतरावर रम्बलर स्टिप, ब्लिंकर्स बसवणे, कणेरी फाटा येथे नवीन ब्रीजचे काम गतीने पूर्ण करणे, ॲप्रोच रस्त्यावर स्पीड ब्रेकर तयार करणे, बाजू पट्टी वाढवणे, अनावश्यक रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करणे, पिरदर्गा ते सांगली फाट्यापर्यंत वाहनांना वेग मर्यादा लावणे, सांगली ते शिरोली सेवा रस्ता जोडणे असे उपाययोजना करण्यात येणार आहे.
चौदा ब्लॅक स्पॉट परिसरात उपाय
माहिती फलक लावणे, दुभाजकांमधील गवत, झाडांच्या फांद्या तोडणे, नो पार्किंग फलक लावणे, मुख्य रस्त्यावर पट्टे मारणे, रोड मार्किंग करणे, रस्ता रुंद करणे.
आठवडी बाजार हलवणे
टोप ते संभापूरपर्यंत ब्लॅक स्पॉट निघण्यासाठी महामार्गलगतचे आठवडा बाजार हलवणे, संभापूर रोडचा उतार कमी करणे अशा उपाययोजना प्रस्तावित आहेत. अंबप फाटा येथे अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना घडत आहेत. नागाव फाटा येथे एका स्टील कंपनीच्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले आहे. यासंबंधी कंपनीस पोलिस प्रशासन पत्र देणार आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची नावे आणि कंसात अंतर असे :
मुरगूड नाका (५०० मीटर), लक्ष्मी टेकडी, कणेरीवाडी फाटा (प्रत्येकी ६०० मीटर), गोकुळ शिरगाव ( ५०० मीटर), उचगाव रेल्वे ब्रीज (प्रत्येकी ६०० मीटर), पीरदर्गा ते सांगली फाटा ( ८०० मीटर), नागाव फाटा (६०० मीटर), कासारवाडी फाटा ( ७०० मीटर), टोप ते संभापूर (८०० मीटर), मंगरायाची वाडी, अंबप फाटा ( प्रत्येकी एक किलोमीटर), वाठार (८०० मीटर), किणी (२०० मीटर), घुणकी (एक किलोमीटर).