१२ हजार जणांनी दिली एमपीएससीच्या पूर्व परीक्षा, कोल्हापूर जिल्ह्यात किती परीक्षार्थी अनुपस्थित राहिले...वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:04 IST2026-01-05T12:03:52+5:302026-01-05T12:04:29+5:30
प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते

संग्रहित छाया
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत एका सत्रात पार पडली. जिल्ह्यातील महाविद्यालये व हायस्कूलमधील ५३ उपकेंद्रांवर ही लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा १२ हजार ६६६ जणांनी दिली.
या परीक्षेसाठी १६ हजार ३१३ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती, तर ३ हजार ६४७ परीक्षार्थी अनुपस्थित होते. परीक्षा कामकाजासाठी जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर जिल्हा केंद्र प्रमुख, निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक, राज्यकर उपायुक्त, जीएसटी भवन कोल्हापूर (विशेष निरीक्षक) यांच्यासह अभिरक्षक, अतिरिक्त अभिरक्षक, सहायक अभिरक्षक व परीक्षा नियंत्रक सहायक यांची नियुक्ती करण्यात आली होती.
परीक्षा व्यवस्थापनासाठी १४ समन्वय अधिकारी, ७८९ समवेक्षक, १४ समन्वय सहाय्यक कर्मचारी, १०६ लिपिक, ३ भरारी पथक अधिकारी, ५३ केटरटेकर, ३ भरारी पथक सहायक कर्मचारी, ४३० शिपाई कर्मचारी, ५३ उपकेंद्रप्रमुख, १२ जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, २३८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक परीक्षार्थीची बायोमेट्रिक पडताळणी व स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
शहरातील सर्व ५३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली असून, कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक कोल्हापूर गजानन गुरव यांनी दिली.