एस.टी. प्रवासातही जीवाला होतेय धाकधूकच; कोल्हापुरात वर्षभरात १०० अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:37 IST2026-03-28T17:35:44+5:302026-03-28T17:37:42+5:30
दहा ठार, ७९ प्रवासी जखमी

संग्रहित छाया
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी चालकांना मार्गदर्शन करण्यात येते. तरीही एसटीचे अपघात वाढतच चालले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात अपघातांनी शंभरी गाठली आहे. गंभीर अपघातात १० जणांना जीव गमवावा लागला आहे तर ७९ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची संख्या वाढत असल्याने प्रवाशांची धाकधूक वाढतच आहे.
प्रवास खरंच किती सुरक्षित ?
एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असे महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. मात्र, अपघाताची संख्या वाढत असल्याने एसटीचा प्रवास सुरक्षित राहिला नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
१० ठार, ७९ जखमी
वर्षभरात किरकोळ, गंभीर, प्राणांतिक असे एकूण १०० अपघात झाले आहेत. गंभीर अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ७९ जण जखमी झाले आहेत.
वारसांना १ कोटींची नुकसानभरपाई
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना सुमारे १ कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. प्रत्येकी दहा लाखांचा विमा प्रवाशांचा उतरवला जातो.
अभियान, प्रशिक्षण देऊनही अपघात कमी होईना
एसटीचे अपघात कमी होण्यासाठी वर्षभर चालक, वाहकांसाठी अभियान राबवले जाते. त्यासाठी तज्ज्ञांतर्फे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात कर्तव्यावर अपघात संख्येत वाढ होत आहे.
तिकिटातल्या १ रुपयातून प्रवाशाचा विमा
एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजना’ राबवली जाते. त्याअंतर्गत तिकिटाच्या दरात केवळ १ रुपया अतिरिक्त घेऊन १० लाखांपर्यंतचा विमा मिळतो.
चालकांची दरवर्षी होते आरोग्य तपासणी
कोल्हापूर विभागात चालकांची दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. डोळे तपासणीसह सर्व प्रकारच्या चाचण्या होतात. त्यात दोषी आढळल्यास तातडीने उपचार केले जातात.
कोणत्या महिन्यात किती अपघात?
महिना / अपघात
जानेवारी / ८
फेब्रुवारी / ५
मार्च / १०
एप्रिल / १०
मे / १०
जून / ९
जुलै / ७
ऑगस्ट / ७
सप्टेंबर / १०
ऑक्टोबर / ८
नोव्हेंबर / ९
डिसेंबर / ७
एकूण १००
कोल्हापूर विभागात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी चालक-वाहकांचे प्रबोधन, प्रशिक्षण दिले आहे. - अभय देशमुख, विभाग नियंत्रक