१०० ‘सावकार’ पोलिसांच्या टेहळणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 11:11 IST2019-12-16T11:08:46+5:302019-12-16T11:11:14+5:30
टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे १०० पेक्षा जास्त खासगी सावकारांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सावकारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत.

१०० ‘सावकार’ पोलिसांच्या टेहळणीत
एकनाथ पाटील
कोल्हापूर : टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे १०० पेक्षा जास्त खासगी सावकारांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सावकारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत.
संशयित सावकारांचे वार्षिक उत्पन्न आणि त्यापेक्षा जास्त असलेल्या मालमत्ता पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळांत बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. सावकारांकडून गरीब, गरजू लोकांना मुलीचे लग्न, शिक्षण, घरबांधणीसह अन्य व्यवसायासाठी हजारो, लाखो रुपयांचे कर्ज दिले जात आहे. त्यानंतर व्याजासह मुद्दल देण्यासाठी सतावून सोडले जात आहे. गरीब लोकांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत.
दरमहा ५ ते १० टक्के व्याजदराने ते कर्ज पुरवितात; त्यामुळे मूळ कर्जापेक्षा त्याचे व्याज देताना कर्जदार हतबल होत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नोंदणी असलेल्या सावकारांवर धाडी टाकल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर खासगी सावकारी करण्याची संख्या शेकडोपेक्षा जास्त आहे. त्यापैकी १०० पेक्षा जास्त सावकारांविरोधात अर्ज पोलिसांकडे दाखल झाले आहेत. प्रत्येक अर्जाची सखोल चौकशी सुरू आहे.
सावकाराचे वार्षिक उत्पन्न आणि त्याच्याकडे सध्या असलेली मालमत्ता यांची पडताळणी करून उत्पन्नापेक्षा वाढीव मालमत्ता निष्पन्न झाल्यास बेकायदेशीर सावकारी या अवैध व्यवसायातून मिळविलेली बेहिशेबी मालमत्ता म्हणून त्याच्यावर टाच आणली जाणार आहे. तसेच गुन्हे दाखल करून सावकारांना कारागृहाची हवा दाखविली जाणार आहे. ज्या सावकारांनी आपली मुले, नातेवाईक यांच्या नावावर मालमत्ता चढविली असेलच, त्यांनाही कारागृहाची हवा खावी लागणार आहे. सावकारीचे मूळ उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोट बांधली आहे.
तक्रारींचा उगम
शहरातील कावळा नाका, राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, विक्रमनगर, वारे वसाहत, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, शिवाजी पेठ, बोंद्रेनगर, आर. के. नगर, सदर बझार यांसह ग्रामीण भागातील हुपरी, भुदरगड, गारगोटी, इचलकरंजी, जयसिंगपूर, शहापूर, शिरोळ, कागल, चंदगड, आजरा, कुडित्रे, सांगरुळ, वाकरे, बालिंगा, दिंडनेर्ली, कोडोली, सातवे, पन्हाळा, कळे, वडणगे, शिये, शिरोली एम. आय. डी. सी., गांधीनगर, वळिवडे, मुडशिंगी, गोकुळ शिरगाव, उचगाव, पाचगाव, आदी ठिकाणांहून १०० पेक्षा जास्त सावकारांविरोधात अर्ज दाखल झाले आहेत. पोलिसांकडून प्रत्येक अर्जाची कसून चौकशी सुरू आहे.
शहरासह उपनगर आणि गावात खासगी सावकार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा. सावकारांच्या धमकीला, दहशतीला बळी पडू नये, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
तिरूपती काकडे,
अप्पर पोलीस अधीक्षक
जिल्ह्यातील खासगी सावकारी मोडून काढा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार रोज तीन-चार अर्जांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तानाजी सावंत,
पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा