मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, तरुण दाम्पत्याने जागेवरच जीव गमावला; संसार उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:57 IST2025-12-19T17:57:10+5:302025-12-19T17:57:10+5:30
Mumbai Nashik Highway Accident News: अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, तरुण दाम्पत्याने जागेवरच जीव गमावला; संसार उद्ध्वस्त
Mumbai Nashik Highway Accident News: मुंबई नाशिक महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. काही मिनिटांचा प्रवास काही तासांवर जातो. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यातच या महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली असून, यामध्ये ३२ आणि २८ वर्षीय एक तरुण दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कळमगावजवळ दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डोंबिवली येथील रोहन दत्तात्रय लुगडे (३२ वर्षे) आणि त्यांची पत्नी अवंतिका रोहन लुगडे वय (२८ वर्षे) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. शहापूर पोलीस आणि रुग्णवाहिकेला घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी लगेचच धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
नेमका कसा घडला अपघात?
मुंबई-नाशिक महामार्गावर कळमगाव परिसरात दोन दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्या. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर प्रवास करणारे कल्याण-डोंबिवली येथील रहिवासी रोहन लुगडे व अवंतिका रोहन लुगडे हे पती-पत्नी यांना जागीच जीव गमवावा लागला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग, निष्काळजीपणा की इतर काही कारण होते याचा तपास शहापूर पोलीस करत आहेत.
दरम्यान, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे नाका परिसरात जगबुडी नदी शेजारी वाशिष्टी डेअरी समोर आज अपघाताची घटना घडली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला आयशर ट्रक वाशिष्टी डेअरी समोरील डायव्हर्शनजवळ अचानक समोर आलेल्या रिक्षामुळे चालकाने तात्काळ ब्रेक लावले. यामुळे ट्रकचे संतुलन बिघडून तो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.