विशाल गवळीचा आठ गुन्ह्यांतील जामीन रद्द करण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 08:19 IST2025-01-01T08:18:15+5:302025-01-01T08:19:03+5:30
कायदेतज्ज्ञ साशंक; फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला

विशाल गवळीचा आठ गुन्ह्यांतील जामीन रद्द करण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न
कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी काेठडीत आहे. त्याच्याविरोधात २०१४ सालापासून दाखल गंभीर गुन्ह्यांत त्याला जामीन झाल्याने अधिक गंभीर गुन्हे करण्याची त्याची हिंमत वाढली. आधीच्या गुन्ह्यातील मंजूर झालेले जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
कायदेतज्ज्ञांनी सांगितले की, अशा प्रकारे जामीन रद्द करण्याची तरतूद नाही. एखाद्या आरोपीला कोणत्या मुद्द्याच्या आधारे जामीन मंजूर झाला, हे पाहावे लागेल. जामिनावर सुटून आरोपी हा त्याने केलेल्या गुन्ह्यातील पीडिताला साक्षीदाराला पुन्हा त्रास देत असेल, तर पीडित आणि साक्षीदार तक्रार करू शकतात. आरोपीचा जामीन न्यायालयाकडून रद्द केला जाऊ शकतो. मागच्या गंभीर गुन्ह्यातील जामीन रद्द करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तपास यंत्रणेने आता घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात तपास करून सबळ पुरावे न्यायालयात सादर करावे. हे प्रकरण आणि मागील आठ गुन्ह्यांतील प्रकरणे ही जलदगती न्यायालयात चालवणे अपेक्षित आहे. मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याने फाशीची शिक्षा होऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
जामीन मिळत गेल्याने भय संपले
- गवळीवर २०१४ सालापासून गेल्या दहा वर्षांत आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
- त्यामध्ये मुलींचा विनयभंग, मुलाच्या सोबत अनैसर्गिक लैगिंक अत्याचार, चोरी, खुनाचा प्रयत्न, तडिपारीचे आदेश भंग करणे याचा समावेश आहे.
- या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला. त्याला जामीन मिळत गेल्याने भय राहिले नाही. त्याची हिंमत वाढली. त्याला या आधीच्या गुन्ह्यात मिळालेले जामीन रद्द करण्याची मागणी पोलिस न्यायालयाकडे करणार आहेत.