भाजपसह शिवसेनेला राष्ट्रवादीचा ‘दे धक्का’; जितेंद्र आव्हाड यांनी दिला पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:19 IST2022-04-22T13:18:51+5:302022-04-22T13:19:34+5:30
मुंबईतील पक्ष कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने विरोधी पक्ष भाजपसह महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला दे धक्का दिल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

भाजपसह शिवसेनेला राष्ट्रवादीचा ‘दे धक्का’; जितेंद्र आव्हाड यांनी दिला पक्षप्रवेश
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाच माजी नगरसेवकांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने विरोधी पक्ष भाजपसह महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला दे धक्का दिल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांमध्ये सुनीता खंडागळे (भाजप), उर्मिला गोसावी (शिवसेना), कुणाल पाटील (भाजप समर्थक अपक्ष), तांजिला मौलवी (एमआयएम), फैजल जलाल (अपक्ष) यांचा समावेश आहे. मात्र, यादीत समावेश असलेले रामभाऊ ओव्हाळ (बसपा) हे माजी नगरसेवक मात्र पक्ष प्रवेशावेळी उपस्थित नव्हते.
पाच माजी नगरसेवकांसह मनसेचे कल्याण पूर्वेतील युवा संघटक संदीप टावरे, माजी शाखा अध्यक्ष रियाज शेख, युवासेना कल्याण पूर्व संघटक जिवा भोसले, युवा सेना अधिकारी मनोज गायकवाड, समाजवादी पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष शिवसागर यादव, एमआयएमचे ठाणे जिल्हाध्यक्ष आयाज मौलवी आदींनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, डॉ. वंडार पाटील, प्रमोद हिंदूराव, शरद महाजन, रमेश हनुमंतेंसह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.