'थोडा आगे बढो' एका वाक्याने घेतला १९ वर्षाच्या अर्णवचा बळी, वडिलांकडून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 12:26 IST2025-11-23T12:17:26+5:302025-11-23T12:26:53+5:30
१९ नोव्हेंबर रोजी कल्याण लोकलमध्ये झालेल्या मारहाणीनंतर अर्णवने टोकाचं पाऊल उचललं.

'थोडा आगे बढो' एका वाक्याने घेतला १९ वर्षाच्या अर्णवचा बळी, वडिलांकडून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी
Mumbai Local Crime : मुलुंडमधील केळकर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय अर्णव जितेंद्र खैरे या विद्यार्थ्याने लोकल ट्रेनमध्ये झालेल्या कथित मारहाणीनंतर मानसिक दबावाखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई लोकल ट्रेनमधील काही सहप्रवाशांनी अर्णवला मराठीऐवजी हिंदीत बोलल्याबद्दल त्रास दिला आणि मारहाण केली, ज्यामुळे अर्णवने टोकाचे पाऊल उचलले.
नेमके काय घडले?
अर्णव प्रथम वर्षाचा बी.एस्सी.चा विद्यार्थी होता. त्याचा फर्स्ट-क्लास पास संपल्यामुळे त्याने मंगळवारी कॉलेजला जाण्यासाठी जनरल क्लासचे तिकीट काढले आणि कल्याण रेल्वे स्थानकावर गर्दीच्या जनरल डब्यात चढला. गर्दीमुळे अर्णवचा एका व्यक्तीला धक्का लागला. तेव्हा त्याने त्या व्यक्तीला फक्त एका वाक्यात, "थोडा आगे बढो" अशी हिंदीतून विनंती केली. या विनंतीमुळेच वाद सुरू झाला.
काही प्रवाशांनी भाषिक मुद्यावरून त्याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. अर्णवने आपण मराठीच आहोत असे सांगितले असतानाही त्या लोकांनी त्याला मारहाण केली. ते आक्रमक प्रवासी त्याला विचारत होते की, तू तुझ्या स्वतःच्या भाषेत बोलण्यास का लाजतोस?या अनपेक्षित घटनेने अर्णववर मोठा मानसिक परिणाम केला. वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, भाषिक वादातून चार ते पाच लोकांनी अर्णवला मारहाण केली.
या घटनेनंतर अर्णव लोकल ट्रेनमधून ठाणे स्टेशनवर उतरला. त्यानंतर तो दुसरी लोकल पकडून मुलुंडला कॉलेजसाठी रवाना झाला. प्रॅक्टिकल परीक्षा झाल्यावर अर्णवने वडिलांना फोन करून लोकलमध्ये झालेल्या घटनेची माहिती दिली. फोनवर त्याने "पप्पा, मला बरं वाटत नाहीये" असं सांगितले होते. घरी परतल्यानंतर त्याने पुन्हा वडिलांना फोन करून भाषिक वादाच्या घटनेचे अधिक माहिती सांगितली.
जितेंद्र खैरे यांनी फोनवर अर्णवला शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याला लवकरच पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे आश्वासनही दिले. मात्र, जितेंद्र खैरे कामावरून घरी परतले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरवाजा आतून बंद असल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. आतमध्ये अर्णवने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याला तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रात्री ९:०५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
न्यायासाठी संघर्ष
मराठी-हिंदी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर अर्णवच्या मृत्यूमुळे एक नवीन वादंग निर्माण झाला आहे. जितेंद्र खैरे हे आपल्या मुलासाठी न्यायाची मागणी करत आहेत. लोकल ट्रेनमध्ये अर्णववर हल्ला करणाऱ्या लोकांना त्यांच्या कृत्याबद्दल जबाबदार धरले जावे, अशी त्यांची मागणी आहे. जितेंद्र खैरे यांचा ठाम विश्वास आहे की, या हल्ल्यामुळे झालेल्या मानसिक ताण आणि भीतीमुळेच त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. त्यांनी म्हटले की, "या घटनेमुळे निर्माण झालेली भीती आणि मानसिक तणावाने त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. मला या प्रकरणाची पूर्ण चौकशी आणि माझ्या मुलासाठी न्याय हवा आहे."