पाच वेळा त्याने मारलाय लोकांच्या हातांवर फटका, नाशिकच्या शेतकऱ्याला गमवावा लागला पाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:36 IST2025-08-05T10:36:00+5:302025-08-05T10:36:18+5:30
तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा गौरव निकम हा रविवारी अशाच हल्ल्यामुळे रेल्वेतून पडला व त्याला पाय गमवावा लागला.

पाच वेळा त्याने मारलाय लोकांच्या हातांवर फटका, नाशिकच्या शेतकऱ्याला गमवावा लागला पाय
कल्याण : धावत्या मेल, एक्स्प्रेसमध्ये दरवाजात उभ्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून लूटमार करणाऱ्या अल्पवयीन इराणी मुलाला कल्याण रेल्वे पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे या मुलावर याआधी पाच गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत मुलगा बालसुधारगृहात जातो व तेथून बाहेर पडताच पुन्हा फटका गँगमध्ये सहभागी हाेत असे. सज्ञान समजून त्याच्या विरोधात खटला चालविण्यात यावा, अशी मागणी न्यायालयात करणार असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली. तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा गौरव निकम हा रविवारी अशाच हल्ल्यामुळे रेल्वेतून पडला व त्याला पाय गमवावा लागला.
कल्याण-आंबिवली रेल्वे ट्रॅकला लागून आंबिवली येथे इराणी वस्ती आहे. या रेल्वे ट्रॅकवर फटका गँग सक्रिय आहे. आंबिवली स्टेशन येण्याच्या आधी एका ठिकाणी रुळाला वळण आहे. गाडीची गती कमी हाेताच चोराने दरवाजात उभ्या असलेल्या गौरवच्या हातावर फटका मारला. फटका बसताच गौरव खाली पडले आणि त्यांचा पाय गाडीखाली कापला गेला. या प्रकरणी सराईत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.
ड्रग्ज, चाेरांचा अड्डा असलेली इराणी वस्ती
कल्याणनजीक असलेली इराणी वस्ती चोरट्यांच्या वास्तव्यामुळे बदनाम आहे. देशभरातील चोरटे या वस्तीत राहतात. इराणी नावाला आधी चष्मे विकायचे. मात्र, तो त्यांचा दाखविण्याचा धंदा होता. खरा धंदा लुटीचा असायचा. ५० वर्षांपूर्वी हे इराणी बलुचिस्तान येथून भारतात आले. त्यातील काहींनी आंबिवली येथे बस्तान बसवले.
वस्तीत पोलिसांनी अनेक वेळा कोम्बिंग ऑपरेशन केले. ज्यावेळी पोलिस इराणी वस्तीत चोरट्यांना पकडण्यासाठी जातात त्यावेळी इराणी महिला-पुरुष पोलिसांवर प्राणघातक हल्ले करतात.
२००८ साली या वस्तीला लागून असलेल्या रेल्वे फाटकावर इराणी चोरांना पकडून नेताना पोलिसांवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी चेन्नई पोलिसांच्या चकमकीत एक इराणी चोरटा मारला गेला.