अंबरनाथमध्ये युतीसाठी केलेले 'जागरण' व्यर्थ ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 07:37 IST2026-01-12T07:30:47+5:302026-01-12T07:37:43+5:30
शिंदेसेनेने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या चार नगरसेवकांना वळवत समीकरण जुळविण्यास सुरुवात केली

अंबरनाथमध्ये युतीसाठी केलेले 'जागरण' व्यर्थ ?
अंबरनाथ: येथील उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप, शिंदेसेनेच्या युतीसाठी शनिवारी रात्रभर चर्चा करण्यात आली. मात्र, त्यामधून तोडगा निघाला नाही. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमने-सामने येणार आहे. संख्याबळानुसार शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष यांचे पारडे जड आहे. मात्र, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या चार सदस्यांना अपात्र ठरवण्याची खेळी भाजपने केली तर शिंदेसेनेचे गणित फिस्कटेल.
शिंदेसेनेने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या चार नगरसेवकांना वळवत समीकरण जुळविण्यास सुरुवात केली. उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी (अजित पवार) तर्फे सदाशिव पाटील हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपच्या वतीने प्रदीप पाटील हे मैदानात आहेत.
शिंदेसेना आणि भाजपने दिलेला शब्द अडचणींचा मुद्दा : शिंदेसेना आणि भाजपने उपनगराध्यक्ष पदाकरिता दिलेला शब्द हाच युतीकरिता अडचणीचा ठरत आहे. भाजपने अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करून प्रदीप पाटील यांना उपनगराध्यक्ष पदाचा शब्द दिला. आयत्या वेळेस अंबरनाथ विकास आघाडीतून बाहेर पडत शिंदेसेनेसोबत गेलेल्या सदाशिव पाटील यांना शिंदेसेनेने उपनगराध्यक्ष पदाचा शब्द दिला. युतीच्या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना शब्द दिल्यामुळेच युतीचा तोडगा निघालेला नाही.
भाजप आणि शिंदेसेनेत युतीची चर्चा
भाजप आणि शिंदेसेना एकमेकांच्या विरोधात असले तरी पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत राष्ट्रवादी (अजित पवार) च्या चार नगरसेवकांवर कारवाई होऊ नये याकरिता प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये युतीसंदर्भात शनिवारी चर्चा सुरू होती. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही.
कुणाकडे किती संख्याबळ ?
सोमवारी सकाळी उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. संख्याबळ पाहता शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे ३२ संख्याबळ आहे. तर भाजपच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अंबरनाथ विकास आघाडीकडे २७नगरसेवकांचे संख्याबळ आहे.
विरोधी पक्षमुक्त करण्याचे प्रयत्न ?
भाजप आणि शिंदेसेनेत युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर सूचना केल्या आहेत. युतीचे गणित यशस्वी झाल्यास सर्व नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे होऊ शकतात. त्यामुळे अंबरनाथमध्ये विरोधी पक्षमुक्त अंबरनाथ परिस्थिती निर्माण होऊ शकते.