डोंबिवलीत भीक मागणाऱ्या तरुणीची हत्या, घरी नेले अन्...; सूटकेसमध्ये भरून फेकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:25 IST2025-11-26T11:25:29+5:302025-11-26T11:25:53+5:30
डोंबिवलीत सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

डोंबिवलीत भीक मागणाऱ्या तरुणीची हत्या, घरी नेले अन्...; सूटकेसमध्ये भरून फेकला मृतदेह
Dombivli Suitcase Murder Case: कल्याण-शीळफाटा रोडजवळील देसाई खाडीजवळ निर्जनस्थळी सुटकेसमध्ये आढळलेल्या २५ ते ३० वर्षीय तरुणीच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा डायघर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. पोलिसांनी फक्त आरोपीला अटकच केली नाही, तर या क्रूर गुन्ह्यामागची धक्कादायक कहाणीही उघडकीस आणली आहे. मृतदेह सापडल्यानंतर या परिसरात खळबळ उडाली होती.
सुटकेसमध्ये आढळला होता कुजलेला मृतदेह
सोमवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीच्या पलावा उड्डाणपुलाखाली देसाई खाडीजवळ एका बेवारस सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. मृतदेहाची अवस्था पाहता, तिचा खून अंदाजे तीन दिवसांपूर्वी झाला असावा आणि ओळख लपवण्यासाठी मृतदेह बॅगेत भरून खाडीत फेकण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे वय २५ ते ३० वर्षांदरम्यान होते.
डायघर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
मृतदेह सापडल्यानंतर डायघर पोलिस ठाणे, क्राइम ब्रँच आणि फॉरेन्सिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सोशल मीडिया आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला आणि केवळ २४ तासांच्या आत विनोद श्रीनिवास विश्वकर्मा नामक आरोपीला अटक केली.
किरकोळ वादातून झाली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव प्रियंका विश्वकर्मा (मूळची उत्तर प्रदेश) असे होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी आरोपी विनोदने मुंब्रा स्टेशनवर भीक मागणाऱ्या प्रियंकाला घरी आणले होते आणि तेव्हापासून ते दोघे एकत्र राहत होते. खुनाचे कारण अत्यंत क्षुल्लक होते. २१ नोव्हेंबरला प्रियंका आणि विनोदमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याच रागाच्या भरात आरोपी विनोदने प्रियंकाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून घरात लपवून ठेवला होता.
दुर्गंधीमुळे मृतदेह पुलावरून फेकला
खुनानंतर २४ तासांनी मृतदेहातून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे आरोपी गोंधळून गेला. २२ नोव्हेंबरला त्याने मृतदेह असलेली बॅग घेतली आणि देसाई खाडीच्या पुलावर जाऊन ती खाली फेकून दिली. सुटकेस खाली पडल्यामुळे ती फुटली आणि मृतदेहाचे काही भाग बाहेर पडले. २४ नोव्हेंबरला एका व्यक्तीने याची माहिती ठाणे पोलिस नियंत्रण कक्षाला दिली, ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि पोलिसांनी तातडीने आरोपीला गजाआड केले.