महायुतीच्या जागावाटप चर्चेवरून भाजपमध्ये नाराजी, आमदारांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:09 IST2025-12-29T16:08:41+5:302025-12-29T16:09:13+5:30
सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करीत आम्हाला युती नको अशी भूमिका घेतली...

प्रतिकात्मक फोटो...
कल्याण : शिंदेसेना आणि भाजपमधील संभाव्य जागा वाटपाच्या चर्चेवरून कल्याणमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. पूर्वेला अवघ्या सात जागा वाट्याला आल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्याकडून संताप व्यक्त करण्यात आला. कल्याण पूर्वेच्या आ. सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करीत आम्हाला युती नको अशी भूमिका घेतली.
पश्चिमेकडील भागातही भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, स्थानिक नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. जागावाटपात शिंदेसेनेच्या वाट्याला अधिक जागा आल्याची चर्चा शनिवारी रात्री वाऱ्यासारखी पसरली. त्यात कल्याण पूर्वेत भाजपच्या वाट्याला अवघ्या सात जागा आल्याची माहिती समजताच कार्यकर्ते संतापले.
भाजपतील नाराजीबाबत माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पक्षात कोणतीही नाराज नसल्याचे सांगितले. परंतु हे सांगताना ते पत्रकारांवर भडकले. कॅमेरे बंद करा नाहीतर मी फेकून देईन अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रचारादरम्यान ही नाराजी उफाळून येते का याकडे नेत्यांचे
लक्ष लागले आहे. कार्यकर्ते झाले आक्रमक कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती मिळताच भाजपचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी हे त्या ठिकाणी पोहोचले आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना शांत केले. भाजप कार्यकर्त्यांची ही नाराजी आणि युतीबाबत असलेल्या त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवू, अशी प्रतिक्रिया यावेळी सूर्यवंशी यांनी दिली.
कल्याणमध्ये निदर्शने -
रविवारी सकाळी कल्याण पश्चिमेकडील भागातही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. नगरपालिका निवडणुकीप्रमाणे या ठिकाणीही युतीऐवजी मैत्रीपूर्ण लढती घेण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांनी केली. यावेळी दादागिरी नहीं चलेगीच्या घोषणा यावेळी दिल्या.
मुस्कटदाबी कशासाठी? -
कल्याण पश्चिमेतील ३८ जागा जिंकण्याची भाजपची ताकद आहे. कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी कशासाठी ? अशी आक्रमक भूमिका भाजपचे माजी आ. नरेंद्र पवार यांनी मांडली.
युतीतच लढा -
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. चर्चेनंतर आहे त्या जागांवर समाधान माना, युतीतच लढा अशा सूचना चव्हाण यांनी दिल्याची माहिती आ. गायकवाड यांनी दिली.