Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 22:01 IST2025-11-21T22:01:12+5:302025-11-21T22:01:54+5:30
बाईक स्वार तिघांसोबत सोबत कार चालकाचा जागीच मृत्यू !

Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
अंबरनाथ : एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने कार ला भीषण अपघात घडला. या अपघातात कार चालकाने उड्डाण पुलावरील बाईक स्वार तिघा जणांना जोरदार धडक दिल्याने तिघे जागीच ठार झाले. या अपघातात कार चालक लक्ष्मण शिंदे हे देखील मृत्यू पावले आहेत.
अंबरनाथ शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पूर्व भागातून पश्चिम भागात जाणाऱ्या एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने त्याने बाईक स्वारांना अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात तीन बाईक स्वार जागीच ठार झाले आहेत. तर या जोरदार धडकेत कार चालक देखील ठार झाला आहे. यातील एक बाईक स्वार या धडकेत उड्डाण पुलावरून उडून ब्रिज च्या खाली पडला आहे. या सगळ्या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. एकूण ३ जण जखमी आहेत त्यांचे जबाब घेवून गुन्हा दाखल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंबरनाथमध्ये सद्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी एक कार भरधाव वेगाने पश्चिम भागात जात असताना हा अपघात घडला. यात अंबरनाथ नगरपालिकेच्या नगररचना विभागात काम करणारे शैलेश जाधव यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने अंबरनाथ शहरावर शोककळा पसरली आहे. तर उड्डाणपुलावर या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
मयताची नावे खालीलप्रमाणे
१) शैलेश जाधव. रा अंबरनाथ
२) चंद्रकांत अनारसे रा अंबरनाथ
३) सुमीत चेलानी रा उल्हासनगर
४) लक्ष्मण शिंदे रा अंबरनाथ पूर्व