कल्याणच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला डाेंबिवलीत भररस्त्यात नेसवली साडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 06:06 IST2025-09-24T06:01:03+5:302025-09-24T06:06:13+5:30
आक्षेपार्ह पोस्टनंतर प्रकार; राजकीय वातावरण तापले

कल्याणच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला डाेंबिवलीत भररस्त्यात नेसवली साडी
डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश ऊर्फ मामा पगारे यांना भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी, दत्ता माळेकर आदींनी भररस्त्यात साडी नेसवल्याची घटना मंगळवारी डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर घडली. त्या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले.
कट्टर काँग्रेस नेते अशी ओळख असलेले पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत, हात पकडून त्यांना साडी नेसवून त्यांचा जाहीर निषेध केला. त्यावेळी जातिवाचक शिवीगाळ केल्याचे पगारे यांचे म्हणणे आहे.
पंतप्रधानांची बदनामी करायची तुमची लायकी आहे का, असे भाजप कार्यकर्ते पगारे यांना सुनावत असल्याचे व पुन्हा असे करण्याची हिंमत कराल का, असा इशारा देत असल्याचे व्हिडीओत दिसते. भाजपचे नंदू परब यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात पगारे यांनी फॉरवर्ड केलेल्या पोस्टसंदर्भात निवेदन दिले होते. काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पगारे यांच्यासोबत जे कृत्य करण्यात आले, त्याचा निषेध केला.
आठ-दहाजण जणांनी शिवीगाळ करून साडी नेसवली. व्हिडीओ चित्रित करून व्हायरल केला. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. - मामा पगारे, काँग्रेस पदाधिकारी
पगारेंचा बीपी वाढला
भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ कल्याण येथे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या कार्यालयात गेले होते. तेथे चर्चा करताना मामा पगारे यांचा रक्तदाब वाढला. त्यानंतर ते बेशुद्ध झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात आले.
मामा पगारे यांनी पंतप्रधानांचा आक्षेपार्ह फोटो ज्या प्रकारे फोटो व्हायरल केला, त्याच प्रकारे त्यांचा आम्ही सत्कार केला. - नंदू परब, जिल्हाध्यक्ष, भाजप