श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:07 IST2025-11-18T10:06:02+5:302025-11-18T10:07:07+5:30
आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी अनमोल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणीही केली होती. मात्र याठिकाणी वामन म्हात्रे यांचे बंधू बाळा म्हात्रे हेदेखील शिंदेसेनेकडून इच्छुक आहेत.

श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदेसेनेला मोठा धक्का दिला आहे. याठिकाणी दिवंगत वामन म्हात्रे यांचा मुलगा अनमोल म्हात्रे आणि सून अश्विनी म्हात्रे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. म्हात्रे यांच्यासोबत अनेक शिंदेसैनिक भाजपात सामील झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेला खिंडार पाडले आहे.
यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, काही वर्षा अगोदर मी आणि वामन म्हात्रे महापालिकेत एकत्र नगरसेवक म्हणून काम केले. १९९५ पासून ते महापालिकेत नगरसेवक म्हणून, स्थायी समिती सभापती म्हणून सातत्याने कामाचा ठसा उमटवत असायचे. माझे आणि त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असायचे. कधीही तुम्हाला मदत लागली तर मी तुमच्यासोबत आहे असं ते मला नेहमी म्हणायचे. माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते पूर्ण सहकार्य करायचे. माझी वामन म्हात्रे यांच्याशी चर्चा करायचो, तेव्हा ते नेहमी मला म्हणायचे, मी कडवट शिवसैनिक आहे. त्यामुळे मनात इच्छा असतानाही विचार करावा की नाही अशा द्विधा मनस्थितीत मी नेहमी राहतो असं ते बोलायचे. मीदेखील कधी तुम्ही भाजपात यावे हे सांगण्याचा प्रयत्न केला नाही असं त्यांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिम येथील महाराष्ट्रनगर, प्रसाद सोसायटी हा प्रभाग वामन म्हात्रे यांनी मागील २५ वर्षापासून बांधून ठेवला आहे. महिला, मंडळे, सार्वजनिक मंडळे अशा विविध माध्यमातून त्यांनी मतदारांची मोठी फळी निर्माण केली आहे. वामन म्हात्रे यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे आणि सून अश्विनी म्हात्रे याठिकाणी कार्यरत होते. आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी अनमोल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणीही केली होती. मात्र याठिकाणी वामन म्हात्रे यांचे बंधू बाळा म्हात्रे हेदेखील शिंदेसेनेकडून इच्छुक आहेत. त्यात उमेदवारी मिळेल की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे अनमोल म्हात्रे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे.
दरम्यान, अलीकडेच अनमोल म्हात्रे यांनी पत्रक काढून प्रभागातील लोकांना आवाहन केले होते. माझ्या वडिलांनी राजकारणाबरोबर अधिक प्रमाणात समाजसेवा लोकभावनेतून केली. प्रभागात विकास कामे केली. संघर्ष, लढवय्या भूमिका घेऊन प्रसंगी दोन हात करून विकास कामे मार्गी लावली. त्यामुळे तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. हा वारसा अजून थांबलेला नाही. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मी कुठेही असेन, पण आपण माझ्यासोबत राहा असं आवाहन त्याने लोकांना केले होते. त्यात अनमोल म्हात्रे, अश्विनी म्हात्रे यांचा भाजपा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.