लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:03 IST2025-11-20T15:02:13+5:302025-11-20T15:03:40+5:30
Kalyan Crime News: लोकलमधून प्रवास करत असताना हिंदीत बोलल्याने टोळक्याने मारहाण केल्याने व्यथित झालेल्या एका विद्यार्थ्याने घरी येऊन जीवन संपवल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. अर्णव खैरे असं या टोकाचं पाऊल उचलणाऱ्या मुलाचं नाव असून, तो कल्याणमधील कोळसेवाडी परिसरातील रहिवासी होता.

लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
गेल्या काही काळापासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद निर्माण होऊत त्यातून मारहाणीसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान, लोकलमधून प्रवास करत असताना हिंदीत बोलल्याने टोळक्याने मारहाण केल्याने व्यथित झालेल्या एका विद्यार्थ्याने घरी येऊन जीवन संपवल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. अर्णव खैरे असं या टोकाचं पाऊल उचलणाऱ्या मुलाचं नाव असून, तो कल्याणमधील कोळसेवाडी परिसरातील रहिवासी होता.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अर्णव हा मुलुंड येथे कॉलेजमध्ये जात होता. घटना घडली त्या दिवशी लोकलमध्ये गर्दी असल्याने तो गर्दीत चेंगरला. त्यावेळी त्याने ‘मेरे पे प्रेशर आ रहा है, आप थोडा आगे बढो ना’, अशी विनंती एका व्यक्तीला केली. मात्र त्याचवेळी गर्दीतील काही जणांनी त्याला मारहाण केली. मारहाण होत असताना अर्णवने मीसुद्धा मराठीच आहे, असं मारहाण करणाऱ्यांना सांगितलं. तेव्हा ‘तुला मराठीत बोलायला काय होतं? मराठीत बोलायला लाज वाटते का’, असं म्हणत दमदाटी केली. दरम्यान, अर्णव याने घडलेल्या घटनेची माहिती फोनवरून कुटुंबीयांना दिली. मारहाणीमुळे मानसिक तणावाखाली आलेला अर्णव त्या दिवशी लवकर घरी परतला. त्यानंतर त्याने संध्याकाळच्या सुमारास, गळफास घेऊन जीवन संपवले,असे अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, अर्णवने गळफास घेतलेला पाहून त्याच्या वडिलांना धक्का बसला. त्यांनी तातडीने मुलाला खाली उतरवून रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी अर्णवला मृत घोषित केले. लोकलमध्ये टोळक्याने मारहाण केल्याने मानसिक धक्का बसल्याने आपल्या मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप अर्णवच्या वडिलांनी केला आहे. तसेच आरोपींवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.