Asian Games 2018: पुरुषांच्या कबड्डीत भारताचा ऐतिहासिक पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:31 IST2018-08-23T17:25:06+5:302018-08-23T17:31:04+5:30
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेतील भारताचा हा ऐतिहासिक पराभव ठरला. कारण यापूर्वी भारताने प्रत्येकवेळी सुवर्णपदक पटकावले होते.

Asian Games 2018: पुरुषांच्या कबड्डीत भारताचा ऐतिहासिक पराभव
जकार्ता : पुरुषांच्या कबड्डीमध्येभारत सुवर्णपदक पटकावू शकत नाही, हे आज स्पष्ट झाले. कारण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इराणनेभारताचा 27-18 असा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाचे सुवर्णपदक हुकले. आशियाई स्पर्धेतील भारताचा हा ऐतिहासिक पराभव ठरला. कारण यापूर्वी भारताने प्रत्येकवेळी सुवर्णपदक पटकावले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीला 1990 साली सुरुवात करण्यात आली, तेव्हापासून आतापर्यंत भारताने सात सुवर्णपदके पटकावली होती. त्यामुळे आशियाई स्पर्धेतून पहिल्यांदाच भारतीय कबड्डी संघाला सुवर्णपदकाविना परतावे लागणार आहे.
दुसऱ्या सत्रामध्ये इराणने आपल्या पकडींच्या जोरावर भारताला काहीसे हतबल केले होते. इराणच्या अब्बासी मैसामने यावेळी दोन वेळा सुपर टॅकल केल्यामुळे इराणच्या गुणांमध्ये वाढ दिली. दुसऱ्या सत्रात चढाई करत असताना अजय ठाकूरला दुखापत झाली. त्याच्या कपाळावरून रक्त यायला लागल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली. सामन्याच्या दुसऱ्या सत्रातील बाराव्या मिनिटाला 17-13 अशी आघाडी घेतली होती. सामन्याला तीन मिनिटे शिल्लक असताना इराणने 25-14 अशी दमदार आघाडी घेतली होती.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. त्यामुळेच पहिल्या सत्रात दोन्ही संघांची 9-9 अशी बरोबरी झाली होती. भारताने यावेळी जोरदार आक्रमण केले, पण इराणने यावेळी चांगल्या पकडी केल्या.