बकऱ्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, न्यायालयाने बकऱ्याला सुनावली 3 वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 19:52 IST2022-05-24T19:52:13+5:302022-05-24T19:52:22+5:30
याप्रकरणी त्या बकऱ्याच्या मालकाला पीडित कुटुंबाला 5 गायी देण्यास सांगितले आहे.

बकऱ्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, न्यायालयाने बकऱ्याला सुनावली 3 वर्षांची शिक्षा
एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी एका बकऱ्याला तीन वर्षांची शिक्षा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बकऱ्याने एका महिलेवर हल्ला केला होता, ज्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर त्या बकऱ्याला अटक करण्यात आली. प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि जिथे त्या बकऱ्याला 3 वर्षांची शिक्षा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दक्षिण सुदानच्या रुम्बेक ईस्ट काउंटीचे आहे. स्थानिक आउटलेट सुदान टुडेच्या वृत्तानुसार, एका महिलेवर बकऱ्याने अचानक हल्ला केला, यात महिला जमिनीवर कोसळली. थोड्यावेळाने महिला उठण्याचा प्रयत्न करत होती, परंतु बकऱ्याने परत तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे महिलेच्या शरीरातील अनेक हाडे तुटली आणि तिचा मृत्यू झाला.
बकरा पोलिसांच्या ताब्यात
एडू चॅपिंग असे मृत महिलेचे नाव आहे. आता त्या बकऱ्याला तीन वर्षांसाठी लेक्स स्टेटमधील एडुएल काउंटी मुख्यालयातील लष्करी छावणीत बंदिस्त केले जाणार आहे. या प्रकरणाची माहिती देताना, लेक्स स्टेट पोलिसांचे प्रवक्ते माबोर मकुआको म्हणाले - पोलिस म्हणून आमची भूमिका सुरक्षा प्रदान करणे आहे. हा बकरा सध्या मालन होक्की पायम पोलिस स्टेशनच्या ताब्यात आहेत.
मालकालाही शिक्षा
महिलेच्या मृत्यूप्रकरणी बकऱ्याच्या मालकालाही शिक्षा झाली आहे. दुओनी मन्यांग झाली यांना दंड म्हणून मृताच्या कुटुंबीयांना 5 गायी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना ती बकरी दिली जाणार आहे. लेक्स स्टेटच्या कायद्यानुसार, एखाद्या प्राण्याने एखाद्या व्यक्तीला मारले, तर तो प्राणी पीडितेच्या कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून दिला जातो.