अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:25 IST2025-10-07T19:25:18+5:302025-10-07T19:25:58+5:30
६२ वर्षीय महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याची मतदार म्हणून नोंदणी केली आणि त्याच्या नावाने दोनदा मतदान केलं.

अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ६२ वर्षीय महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याची मतदार म्हणून नोंदणी केली आणि त्याच्या नावाने दोनदा मतदान केलं. महिलेवर आता अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लॉरा ली युरेक्स असं महिलेचं नाव असून माया जीन युरेक्स असं तिच्या कुत्र्याचं नाव आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर हे समोर आलं, ज्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना कॅलिफोर्नियाच्या दोन वेगवेगळ्या निवडणुकांशी संबंधित आहे. पहिली २०२१ ची गव्हर्नर रिकॉल निवडणूक होती आणि दुसरी वेळ २०२२ च्या प्राथमिक निवडणूक होती, जिथे कुत्र्याच्या नावाने मतदान करण्यात आलं होतं. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, पहिल्या निवडणुकीत मत स्वीकारलं गेलं होतं, परंतु दुसऱ्या निवडणुकीत बॅलेट रिजेक्ट झालं. तपासात असं दिसून आलं की, कुत्र्याचं नाव मतदान यादीत समाविष्ट होतं, परंतु सिस्टम ते ओळखण्यात अपयशी ठरली. अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, पाळीव प्राण्यांच्या नावाने मतदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये लॉरा लीने स्वतः ऑरेंज काउंटी रजिस्ट्रार ऑफ व्होटर्सना कळवलं की, तिने तिच्या कुत्र्याची मतदार म्हणून नोंदणी केली आहे तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. तपासात असंही उघड झालं की, महिलेने स्वतः सोशल मीडियावर पुरावे पोस्ट केले होते. जानेवारी २०२२ मध्ये, तिने कुत्र्याचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये कुत्र्यावर "मी मतदान केलं" असा स्टिकर लावलेला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये एक पोस्ट शेअर केली.
ऑरेंज काउंटी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी ऑफिसने लॉरा ली युरेक्सविरुद्ध अनेक आरोपांखाली खटला दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे केवळ निवडणूक नियमांचं उल्लंघन नाही तर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचा गंभीर गुन्हा देखील आहे. या घटनेत आणखी कोणी सामील आहे का हे तपास संस्था आता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना धक्का बसला आहे. लोक सोशल मीडियावर "डॉगी व्होट स्कँडल" म्हणून ते शेअर करत आहेत.