एका डझनात नेहमी 12च वस्तू का असतात, 10 किंवा 11 का नाही? समजून घ्या यामागचं गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:29 IST2025-10-08T17:27:55+5:302025-10-08T17:29:02+5:30
Why 12 means dozen : या 12च्या मागे फक्त परंपरा नाही, तर त्यामागे गणित, इतिहास आणि विज्ञानाचं एक मनोरंजक कारण दडलेलं आहे. तेच आज आपण समजून घेणार आहोत.

एका डझनात नेहमी 12च वस्तू का असतात, 10 किंवा 11 का नाही? समजून घ्या यामागचं गणित
Why 12 means dozen : आपण जर बाजारात जात असाल आणि केळी घायची असतील तर ती आपल्याला किलोप्रमाणे नाही तर डझनानुसार मिळतात. अशा अनेक वस्तू असतात ज्या डझनानी मिळतात. डझनभर केळी म्हणजे 12, पण आपण कधी विचार केलाय का की, एक डझनामध्ये 12च वस्तूच का असतात? 10 नाही, 11 नाही थेट 12! अंडी असोत, केळी असोत किंवा मिठाई सर्वकाही ‘डझन’मध्येच मोजलं जातं. पण या 12च्या मागे फक्त परंपरा नाही, तर त्यामागे गणित, इतिहास आणि विज्ञानाचं एक मनोरंजक कारण दडलेलं आहे. तेच आज आपण समजून घेणार आहोत.
‘डझन’ शब्द आला कुठून?
मुळात ‘डझन’ हा शब्द इंग्रजीतील 'dozen' या शब्दातून आला आहे आणि 'dozen' हा शब्द लॅटिन भाषेतील 'duodecim' पासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ 'बारा' म्हणजेच 12 असा होतो. म्हणजे भाषिकदृष्ट्या 'डझन' म्हणजेच '12'. हे पुढे अजून खोलात समजून घेऊ.
प्राचीन गणनेचं रहस्य
आज आपण 10 वर आधारित दशमान पद्धत (Decimal System) वापरतो. म्हणजे 10, 100, 1000 इत्यादी. पण प्राचीन काळात अनेक संस्कृतींमध्ये 12 वर आधारित पद्धत वापरली जात होती. इजिप्त, रोम आणि बाबिलोन या प्राचीन संस्कृतींमध्ये 12 ला एक 'पूर्ण चक्र' मानलं जायचं. कारण एका वर्षात 12 महिने असतात. घड्याळात 12 तासांचा चक्र असतं. एक वर्तुळ 12 समान भागांमध्ये विभागणं सोपं असतं. म्हणून 12 ला पूर्णता आणि संतुलनाचं प्रतीक मानलं जात होतं.
व्यापारात 12चं महत्त्व
प्राचीन युरोपात बाजारात वस्तू विकताना व्यापारांनी 12 ला मोजमापाचं व्यावहारिक एकक म्हणून स्वीकारलं. 12 वस्तूंचे अर्धे, चतुर्थांश किंवा सहावे भाग काढणं सोपं होतं, त्यामुळे हिशेबात चूक होण्याची शक्यता कमी व्हायची. हळूहळू ही पद्धत इतकी रूढ झाली की 12 वस्तू = एक डझन.
‘बेकर्स डझन’ म्हणजे काय?
काही मीडिया रिपोर्टनुसार, एक काळ असा होता की ‘बेकर्स डझन’ म्हणजे 13 वस्तू मानल्या जात होत्या. इंग्लंडमध्ये बेकरीवाले जेव्हा बन किंवा ब्रेड विकत असत, तेव्हा ते एका डझनमध्ये 13 वस्तू देत असत. कारण वजनात थोडीफार कमतरता निघाल्यास ग्राहकाला नुकसान होऊ नये. म्हणून 13वा तुकडा बोनस म्हणून दिला जात असे.
पण 12 ही संख्या पूर्ण वाटते. म्हणून जेव्हा एखाद्या वस्तूंचा समूह 12चा असतो, तेव्हा तो आपल्याला 'पूर्ण' वाटतो. याच कारणानं अंडी असो किंवा केळी त्यांची गिनती 12 झाली तेव्हाच ‘एक डझन’ मानली जाते.