Clock In Hotel Rooms : सुट्ट्यांमध्ये कधी कुठे फिरायला गेलात किंवा एखाद्या कामासाठी दुसऱ्या शहरात जाणं झालं तर सामान्यपणे सगळे लोक हॉटेलमध्ये थांबतात. यावेळी हॉटेल रूमची स्वच्छता, व्यवस्था आणि सजावटीकडे लक्ष जातच. पण एक खास गोष्ट आपल्या नजरेतून सुटते. ती म्हणजे हॉटेलमधील रूमच्या भींतीवर नसलेलं घड्याळ. आपण कधी लक्ष दिलं असेल किंवा नसेलही हॉटेल रूमच्या भींतीवर घड्याळ नसतं. तसेच टेबलवरही अलार्मसाठी घड्याळ ठेवलेलं नसतं. हा काही योगायोग नाही, यामागे काही खास कारणं असतात. जे आपल्याला माहीत नसतात. ते काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
आरामाची जाणीव
साधारणपणे हॉटेलमध्ये आपण कशासाठी थांबतो, तर आराम मिळवण्यासाठी. पण जेव्हा आराम करण्याच्या जागेवर घड्याळ असेल आणि आपण ती बघितली तर मेंदूवर सतत वेळेचा दबाव राहतो. कधी जागायचं आहे, कधी निघायचं आहे या गोष्टी डोक्यात सुरू राहतात. हॉटेलवाले हाच दबाव दूर करण्यासाठी रूममध्ये घड्याळ ठेवत नाहीत. जेणेकरून आपल्याला मोकळं वाटावं आणि वेळेचं भान न ठेवता आपल्याला आराम करता यावा.
हॉटेलचा फायदा
हॉटेलच्या रूममध्ये घड्याळ नसण्याचं कारण म्हणजे ग्राहकांनी हॉटेलमध्ये जास्त वेळ घालवणं. जर आपल्यासमोर घड्याळ नसेल तर आपल्याला वेळेचा अंदाज नसतो. अशात आपण हॉटेलमधील रेस्टॉरंट, स्पा किंवा बारसारख्या सेवांचा वापर करतो. ज्यामुळे हॉटेलची कमाई वाढते. घड्याळ नसल्याने लोक लवकर चेकआउट करण्याचा विचारही करत नाहीत.
डिजिटल युग
आजकाल प्रत्येकाकडे मोबाइल फोन असतो. त्यात वेळही बघता येते, अलार्मही लावता येतो आणि रिमाइंडरही लावता येतो. त्यामुळे हॉटेलवाले जास्तीचा खर्च करून घड्याळ का लावतील? हेच कारण आहे की, जास्तीत जास्त मोठ्या हॉटेल्सच्या रूममध्ये घड्याळाची गरज पडत नाही. काही हॉटेल्स गरज असेल तर वेकअप कॉलची सुविधाही पुरवतात.
स्वच्छता आणि खर्च
प्रत्येक हॉटेलच्या मॅनेजमेंटला हेच वाटत असतं की, त्यांच्या रूम्स स्वच्छ आणि व्यवस्थित असाव्यात. घड्याळासारख्या छोट्या वस्तूने त्याची बॅटरी चेक करणे, लागलेलं जाळं काढणे, स्वच्छता करणे यात स्टाफचा बराच वेळ जातो. मोठ्या हॉटेल्समध्ये भरपूर रूम्स असतात. अशात घड्याळांची देखरेख खर्चीक होते. त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट ते न लावण्यावर अधिक भर देतात.