रेल्वेच्या गेटजवळील खिडक्यांनाच का असतात जास्त लोखंडी रॉड? पाहिल्या तर असतीलच, आता कारण वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:44 IST2026-01-08T12:41:57+5:302026-01-08T12:44:07+5:30
Railway Interesting Facts : आपण पाहिलं असेल की, रेल्वेच्या दरवाज्या जवळच्या खिडकीमध्ये सामान्यापेक्षा जास्त रॉड लावलेले असतात. यामागचं कारण अनेकांना माहीत नसतं.

रेल्वेच्या गेटजवळील खिडक्यांनाच का असतात जास्त लोखंडी रॉड? पाहिल्या तर असतीलच, आता कारण वाचा
Railway Interesting Facts : भारतीय रेल्वे ही जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. भारतीय रेल्वेकडून रोज साधारण १३ हजारांपेक्षा जास्त प्रवासी रेल्वे आणि ११ हजारांपेक्षा जास्त मालवाहू रेल्वे म्हणजे एकंदर दिवसाला २५ हजार रेल्वे चालवल्या जातात. रेल्वेच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी नेहमीच समोर येत असतात. ज्या लोकांना जाणून घेण्यासही आवडतात. पण अनेकदा रेल्वेने प्रवास करूनही किंवा काही गोष्टींकडे बघूनही त्यातील गुपित काही लोकांना माहीत नसतं. असंच एक गुपित आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. आपण अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेलच. पण कधी हे नोटिस केलं का की, दरवाज्याच्या बाजूला असलेली खिडकी सर्वात वेगळी का असते. ती वेगळी का असते?
रेल्वेत जर विंडो सीट मिळाली तर वेगळीच मजा येते. कारण बाहेरचा निसर्ग, वेगवेगळी नवीन शहरं बघायला मिळतात. तसेच बाहेरचा गार वाराही मिळतो. सामान्यपणे सगळ्याच रेल्वेच्या स्लीपर आणि जनरल कोचमधील खिडक्यांना आडवे रॉड लावलेले असतात. पण आपण पाहिलं असेल की, दरवाज्या जवळच्या खिडकीमध्ये सामान्यापेक्षा जास्त रॉड लावलेले असतात. यामागचं कारण अनेकांना माहीत नसतं.
खिडकीला जास्त रॉड असण्याचं कारण...
रेल्वेच्या दरवाज्या जवळच्या खिडकीला जास्त रॉड असण्यामागे खूप महत्वाचं असं कारण असतं. हे कारण म्हणजे सुरक्षा असतं. दरवाज्या जवळच्या खिडकीमधून चोरी होण्याचा धोका अधिक असतो. चोर अनेकदा या खिडकीतून चोरी करताना आढळले होते. दरवाज्या जवळच्या पायऱ्यांवरून या खिडकीपर्यंत सहज पोहोचता येतं.
रात्रीच्या वेळी जेव्हा प्रवाशी झोपलेले असतात, तेव्हा चोर या खिडक्यांमधून सहजपणे प्रवाशांच्या वस्तू चोरी करत होते. ही समस्या टाळण्यासाठी या खिडक्यांना सामान्यापेक्षा अधिक रॉड लावण्यात येऊ लागले. जास्त रॉडमुळे यातील गॅप इतका कमी झाला की, त्यातून हात जाणे अवघड होते. त्यासोबतच दरवाज्यावरील खिडकीला सुद्धा सामान्यापेक्षा अधिक रॉड लावलेले असतात. जेणेकरून रात्री रेल्वे रस्त्यात मधेच कुठे थांबली तर चोरांना त्यातून हात टाकून दरवाजा उघडता येऊ नये.
रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट का नसतं?
काही रिपोर्ट्सनुसार, इंजिनामध्ये लोको पायलटला बसण्यासाठी केवळ एक सीट असते. रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट नसतं कारण इंजिनात जागेची कमतरता असते. इंजिन केवळ टेक्निकल उपकरणे आणि कंट्रोल पॅनलने भरलेलं असतं. तसेच सुरक्षेच्या कारणांनी सुद्धा इंजिनात टॉयलेट असणं शक्य नाही. इंजिन फारच संवेदनशील असतं आणि टॉयलेटसारखी व्यवस्था सुरक्षेसाठी धोका ठरू शकते. त्यामुळे यात केवळ आवश्यक उपकरणेच असतात.
रेल्वेत दोन इंजिन का असतात?
आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण दोन इंजिन असलेल्या रेल्वेला मल्टीपल यूनिट ऑपरेशन म्हटलं जातं. रेल्वेत जास्त वजन ओढण्याची क्षमता असावी यासाठी दोन इंजिन लावलेले असतात. मालगाड्या, कोळसा, सीमेंट, तेल आणि जड कंटेनर वाहून नेणाऱ्या रेल्वेमध्ये १ इंजिन पुरेसं नसतं. त्यामुळेच दोन इंजिनांचं वापर केला जातो. लांब पल्ल्यांच्या सुपरफास्ट रेल्वेंमध्ये कधी कधी डबल इंजिन लावलं जातं, जेणेकरून स्पीड आणि नियंत्रण दोन्ही व्यवस्थित रहावं. दोन्ही इंजिनांचं नियंत्रण एकाच लोको पायलटकडे असतं.