लग्न, घटस्फोट अन् आता पुन्हा साखरपुडा... २ वर्षात दोनदा 'प्रेमात'; दुबईची राजकुमारी चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:52 IST2025-08-29T15:46:37+5:302025-08-29T15:52:23+5:30
Dubai Princess Sheikha Mahra : दुबईच्या राजघराण्यातील राजकुमारी आणि प्रसिद्ध रॅपर यांच्या साखरपुड्याची बातमी सध्या जगभरात चर्चेत आहे.

लग्न, घटस्फोट अन् आता पुन्हा साखरपुडा... २ वर्षात दोनदा 'प्रेमात'; दुबईची राजकुमारी चर्चेत
Dubai Princess Sheikha Mahra : दुबईच्या राजघराण्यातील राजकुमारी आणि प्रसिद्ध रॅपर यांच्या साखरपुड्याची बातमी सध्या जगभरात चर्चेत आहे. या राजकुमारीचे नाव शेखा माहरा आहे. ती दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची मुलगी आहे. शेखा हिने अलीकडेच प्रसिद्ध मोरोक्कन-अमेरिकन गायक आणि रॅपर फ्रेंच मोंटानाशी साखरपुडा केला आहे. फ्रेंच मोंटानाचे खरे नाव करीम खरबुश आहे. फ्रेंच मोंटानाच्या प्रतिनिधीने अमेरिकन मनोरंजन पोर्टल TMZ ला या साखरपुड्याची पुष्टी केली. शेखा माहराने घटस्फोटानंतर अवघ्या दोन वर्षांत साखरपुडा केल्याने हे नाते चर्चेत आहे. लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा
मे २०२३ मध्ये शेखा माहराने शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूमशी लग्न केले. पण हे नाते फार काळ टिकले नाही आणि जुलै २०२४ मध्ये शेखाने सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली. ही पोस्ट व्हायरल झाली आणि त्यानंतर फ्रेंच मोंटानासोबतच्या तिच्या नात्याबद्दल चर्चा तीव्र झाली.
फॅशन वीकमध्ये नवे नाते
माहितीनुसार, २०२४च्या अखेरीस शेखा माहरा फ्रेंच मोंटानाला दुबईच्या दौऱ्यावर घेऊन गेली. तेव्हापासून, दोघेही अनेक वेळा एकत्र दिसले आहेत. ते कधी मोरोक्को आणि दुबईमध्ये फिरताना दिसले, तर कधी रेस्टॉरंटमध्ये जेवत होते तर कधी ऐतिहासिक स्थळांना भेट देत होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये पॅरिस फॅशन शोमध्ये हातात हात घालून एकत्र फिरताना त्यांचे नाते निश्चित झाले. जून २०२५ मध्ये पॅरिस फॅशन वीक दरम्यान फ्रेंच मोंटानाने तिला औपचारिकपणे प्रपोज केले. मात्र, त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
शेखा माहरा आणि फ्रेंच मोंटानाबद्दल...
शेखा महरा हिने युनायटेड किंग्डममधील एका विद्यापीठातून 'इंटरनॅशनल रिलेशन्स'मध्ये पदवी घेतली आहे आणि दुबईतील मोहम्मद बिन रशीद स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून विशेष पदवी देखील घेतली आहे. सध्या ती दुबईतील एका संशोधन आणि शैक्षणिक संस्थेशी संबंधित आहे. तिचा होणारा पती फ्रेंच मोंटाना याचा जन्म मोरोक्कोमध्ये झाला होता आणि तो १३ वर्षांचा असताना कुटुंबासह अमेरिकेत आला. त्याने २००० च्या दशकाच्या सुरुवातीला आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि लवकरच तो जगभरात प्रसिद्ध झाला. त्याने २००७ मध्ये नादिन खारबुशशी लग्न केले, परंतु २०१४ मध्ये हे दोघे वेगळे झाले. तिच्यापासून त्याला क्रूझ खारबुश हा १६ वर्षांचा मुलगा आहे.